विजयवाडा 14 डिसेंबर : आंध्र प्रदेशातल्या नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीची 16 लाख रुपयांना फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. वडिलांच्या यूपीआय खात्यातून त्यांच्या नकळत काढलेली 80 हजार रुपयांची रक्कम परत करण्यासाठी तिने किडनी विकण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नादरम्यान तिला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांकडून तिची फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तिने तिच्या वडिलांसह गुंटूर जिल्हा पोलीस अधीक्षक के. आरिफ यांच्याकडे तक्रार केली. मिळालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंटूर जिल्ह्यातल्या फिरंगीपुरम इथली ही मुलगी हैदराबादमध्ये नर्सिंगचा कोर्स करत आहे. ती घरापासून दूर राहून शिकत असल्याने, तिच्या वडिलांनी तिला आपला मोबाइल फोन दिला होता, जेणेकरून ती त्यांच्याशी संवाद साधेल आणि कोणत्याही अडचणीशिवाय सोशल मीडिया वापरू शकेल. तिला वडिलांच्या मोबाइलमध्ये यूपीआय अकाउंट सापडलं आणि तिने त्यातून 80 हजार रुपये खर्चून घड्याळं, कपडे आणि इतर वस्तूंची ऑनलाइन खरेदी केली. तिने खर्च केलेली रक्कम वडिलांच्या लक्षात येण्यापूर्वीच तिला पुन्हा पैसे डिपॉझिट करायचे होते.
हे ही वाचा : बीड : थांब तूझं नाकच कापतो म्हणत पतीचं पत्नीसोबत धक्कादायक कृत्य, संतापजनक कारण समोर
किडनी विकून पैसे कमावता येतात, हे एका मैत्रिणीकडून या मुलीला समजलं. त्यानंतर तिनं ऑनलाइन शोध घेतला. ‘किडनीची नितांत गरज आणि दात्याला सात कोटी रुपये मिळतील’, अशी जाहिरात तिच्या निदर्शनास आली. जाहिरातीसोबत तिला डॉ. प्रवीण राज नावाच्या व्यक्तीचा फोटो, फोन नंबर आणि ई-मेल आयडी दिसला.
तिने प्रवीण राज नावाच्या व्यक्तीला फोन केला. त्याने तिला अर्धी रक्कम सुरुवातीला आणि बाकीची रक्कम किडनी दिल्यानंतर दिली जाईल, असं सांगितलं. त्याने तिला काही वैद्यकीय चाचण्याही करायला सांगितलं. या मुलीने चाचण्या करून आपले वैद्यकीय अहवाल प्रवीणला पाठवले. ती तिची किडनी दान करण्यास पात्र आहे, असं तिला सांगण्यात आलं. तिच्याकडे वैयक्तिक बँक खातं नसल्यामुळे तिने तिच्या वडिलांच्या बँक खात्याचा तपशील प्रवीणला पाठवला. प्रवीण राजने तिच्या वडिलांच्या खात्यात 3.5 कोटी रुपये जमा केल्याचा स्क्रीनशॉट तिच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला.
त्यानंतर मुलीनं तिच्या वडिलांचं बँक खातं तपासलं असता, तिला रक्कम जमा झाली नसल्याचं दिसलं. तिने प्रवीण राजशी संपर्क साधला. त्याने सांगितलं, की ही रक्कम अमेरिकन डॉलर्समध्ये आहे आणि ती भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी तिला कर भरावा लागेल. यासाठी मार्च ते ऑक्टोबर महिन्यात तिच्याकडून त्याने हप्त्याने सोळा लाख रुपये घेतले. तिने 3.5 कोटी रुपये मिळण्याबाबत शंका व्यक्त केल्यावर प्रवीण राजने तिच्या वडिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा केले. तिने त्याला ई-मेल पाठवून तिची रक्कम परत करण्याची मागणी केली असता त्याने तिला दिल्लीला बोलावलं. ही मुलगी विमानाने दिल्लीला पोहोचली; मात्र त्याने तिच्या फोन कॉलला प्रतिसाद दिला नाही.
हे ही वाचा : श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर राज्य सरकारचे महत्त्वपूर्ण पाऊल; आंतरधर्मीय विवाहाबाबत मोठा निर्णय
निराश झालेली विद्यार्थिनी परत आली. तिने पुन्हा प्रवीण राजशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या कॉलला प्रतिसाद दिला. त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे 1.5 लाख रुपयांची मागणी केली आणि ते भरल्यावरच पैसे परत मिळतील असं सांगितलं. या वेळी मात्र सायबर गुन्हेगारांनी आपली फसवणूक केल्याचं तिच्या लक्षात आलं.
यादरम्यान, तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. एनटीआर जिल्ह्यातल्या कांचीकाचेरला येथे मैत्रिणीच्या घरी ही विद्यार्थिनी आढळली. पोलिसांनी तिला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर मुलीने झालेल्या प्रकरणाची माहिती वडिलांनी दिली. त्यानंतर दोघांनी गुंटूरच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.