लखनऊ, 28 मार्च: होळीचा सण म्हटलं तर गोडधोड आलंच. जर सणाच्या दिवशी तोंडाला गोडवा आला नाही तर सण साजरा केल्याची मजाच येत नाही. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो. तर नवाबांचं शहर म्हणून ओळख असलेल्या अर्थात लखनऊमध्ये गुजियाचा गोडवा घेत मजा लुटली जाते. मात्र यंदाच्या होळीत लखनौमध्ये ‘बाहुबली गुजिया’ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. होळी सणाचं औचित्य साधत लखनौमधील प्रसिद्ध असलेल्या ‘छप्पन भोग’ दुकानात खास ‘बाहुबली गुजिया’ तयार करण्यात आला आहे. ‘बाहुबली गुजिया’त नेमकं काय आहे? दुकानदाराने ठेवलेल्या नावाप्रमाणेच हा गुजिया बाहुबली आहे. या गुजियाचं वजन 1.5 किलोग्राम इतकं असून 14 इंच मोठा आहे. या ‘बाहुबली गुजिया’त मावा, केसर, बदाम, पिस्ता आणि साखरेचं सारण भरलं आहे. हा इतका मोठा गुजिया तळण्यासाठी जवळपास 20 ते 25 मिनिटं इतका वेळ लागतो. गोडवा, वजन आणि आकार पाहता त्याची किंमतही तशीच आहे. एका ‘बाहुबली गुजिया’ची किंमत 1200 रुपये इतकी आहे.
छप्पन भोग दुकानदार दरवर्षी होळी सणाचं औचित्य साधत नव नवे प्रयोग करतो. या नव्या कल्पनेला लोकांचा प्रतिसादही तसाच मिळतो. काही जण याची चव घेण्यासाठी येतात, तर काही जण हा बाहुबली गुजिया बघण्यासाठी येत असल्याचं मार्केटींग टीमकडून सांगण्यात आलं आहे. (हे वाचा- काय ती हौस! दोन महिन्याच्या मुलासाठी चंद्रावर घेतली जमीन, जाणून घ्या किंमत ) गेल्या वर्षी कोलकातामधील एका मिठाई दुकानात असाच प्रयोग करण्यात आला होता. कोरोना विषाणूच्या आकाराची मिठाई बनवण्यात आली होती. मिठाईतून त्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केले होते. तेव्हा त्यांनी लोकांना या मिठाईचं मोफत वाटपही केले होते.