सौरभ तिवारी, प्रतिनिधी अंबिकापूर, 14 जुलै : पावसाने आता चांगलाच जोर धरला असून विविध राज्यांतील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अशातच बिळांमधून विषारी प्राणीही बाहेर पडले आहेत. घरातील, रस्त्यावरील अडगळीच्या ठिकाणी साप आढळल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये तर चक्क दुचाकीत साप आढळला. सरगुजा जिल्ह्यात असलेल्या अंबिकापूरमध्ये हा दुचाकीस्वार रस्त्यावरून जात असताना त्याला दुचाकीत काहीशी विचित्र हालचाल जाणवली. तेव्हा निरखून पाहिलं असता गाडीत साप शिरल्याचं त्याच्या लक्षात आलं. हा तरुण जर घाबरला असता तर गाडीवरून त्याचं नियंत्रण सुटलं असतं आणि मोठा अनर्थ घडला असता. मात्र त्याने प्रसंगावधानता दाखवून तातडीने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर सर्पमित्र सत्यम दुबे यांना फोन करून याबाबत माहिती दिली.
सत्यम दुबे घटनास्थळी दाखल झाल्यावर त्यांनी सापाला ताब्यात घेतलं. सुरुवातीला त्यांनी गाडीचे काही पार्ट्स उघडून साप नेमका कुठे आहे पाहिलं. समोरचं कव्हर उघडताच एक बारीक काळसर साप दुचाकीवरून रस्त्यावर उतरून सरपटत पुढे गेला, त्याला पकडण्यासाठी सत्यम त्याच्या मागोमाग गेले. ही धरपकड पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, सत्यम दुबे यांना आतापर्यंत हजारो साप पकडण्याचा अनुभव आहे. त्यांनी अगदी दुर्मिळ सापसुद्धा पकडले आहे. म्हणूनच त्यांना ‘स्नेकमॅन’ या नावाने ओळखलं जातं.
विशेष म्हणजे सत्यम दुबे यांनी एक प्राण्यांचं घरही सुरू केलं आहे. तिथे ते गाय, माकड यांसारख्या अनेक प्राण्यांचं संगोपन करतात. ते म्हणतात, ‘साप हा इतर प्राण्यांसारखाच एक निरागस प्राणी आहे. माणसं त्याला विनाकारण घाबरतात आणि त्याच्यावर हल्ला चढवतात. म्हणूनच मी सापांना पकडतो, जेणेकरून साप आणि माणूस दोघांचाही जीव वाचतो.’