नवी दिल्ली, 31 जानेवारी: डेटिंग वेबसाइटवरचं (Dating Site) प्रेम (Love) एका मुलीला जवळपास एक कोटीला पडलंय! ब्रिटिश मुलीसोबत (British girl) प्रेमाचा बहाणा करत एका व्यक्तीने तिला तब्बल एक कोटी रुपयांना चुना लावल्याची घटना घडली आहे. प्रेमामध्ये एखादी व्यक्ती किती आंधळी होऊ शकते, याचे हे उदाहरण असून फसवणूक झालेल्या मुलीने यामधून धडा घेत इतरांना सावध राहण्याचा सल्ला दिलाय. एका ब्रिटिश मुलीने डेटिंग साइटवर भेटलेल्या मुलाकडून कशी फसवणूक झाली, याचा अनुभव ऑनलाइन शेअर केलाय. डेटिंग साइटवर पहिल्यांदा भेटल्यानंतर दोघांनी एकमेकांचा नंबर घेतला आणि बोलायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचं प्रेम फुलू लागलं. मुलीने त्या मुलासोबत लग्नाची स्वप्नं पाहण्यास सुरुवात केली, परंतु एकेदिवशी असं काही घडलं की सर्वकाही बदललं. त्या मुलाने मुलीला वेळोवेळी पैशांची मागणी करत तब्बल तिच्याकडून एक कोटी रुपये घेतले, आणि जेव्हा मुलीने त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. डेटिंग साइटवर प्रेमाच्या गोष्टी बोलून स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, संबंधित मुलीने तिचा अनुभव ऑनलाइन शेअर केला आहे. लॉकडाउनमुळे झाली नाही भेट - पीडित मुलीने Metro.co.uk साइटवर तिचा अनुभव शेअर केला आहे. तिचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. ती म्हणते, ‘मी एप्रिल 2020 मध्ये एका डेटिंग साइटवर निक नावाच्या तरुणाला भेटले होते. काही दिवसांनी, मला वाटू लागलं की, तो चांगला माणूस असून माझी काळजी घेतोय. काही दिवसांतच आम्ही दोघांनी एकमेकांचा मोबाईल नंबर घेतला आणि व्हॉट्सअॅप ( WhatsApp) आणि कॉल्सवर बोलणं सुरू केलं. आम्ही एकमेकांसोबत विविध गोष्टी शेअर करू लागलो. तो माझं ऐकतोय, मला समजून घेतोय, आम्ही दोघे जवळ आलोय, असं मला वाटत होतं. मी त्याच्यासोबत लग्न करण्याची स्वप्नं पाहत होते. लॉकडाउनमुळे आमची भेट होऊ शकली नाही, पण मेसेज-कॉल्स इत्यादींद्वारे आम्ही सतत संपर्कात होतो.
हे वाचा - 9 मजल्यावरुन थेट BMW कारवर कोसळला व्यक्ती; पुढे जे घडलं ते जाणून व्हाल थक्क
निकने मात्र संबंधित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. कधी गरिबीच्या बहाण्याने तर कधी आजारपणाचे कारण सांगून तो तिच्याकडे पैसे मागायचा. कधी-कधी कर्ज फेडण्यासाठीही तो तिच्याकडे पैसे मागत होता. पीडित मुलगी म्हणते, ‘माझ्याकडे तो सतत पैसे मागत होता. त्यामुळे तो माझी फसवणूक तर करत नाही ना, असा मला संशय आला. पण त्यानंतरही मी त्याला पैसे देत राहिले. त्याने सांगितलेल्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये आठ वेळा मी पैसे ट्रान्सफर केले होते. जवळपास एक कोटी रुपये मी त्याला पाठवले. पुढे निक आणि माझं नातं जून 2020 मध्ये संपुष्टात आलं.’ निक आजारी असल्याचं समजल्यानंतर पीडित मुलीने त्याला कॉल केला. तेव्हा त्याच्या मुलीने सांगितले की, ‘निकचा मृत्यू झाला, तो आता या जगात नाही.’ त्यावेळी पीडितेने त्या मुलीला सांगितले की, ‘मी निकला एक कोटी कर्ज दिलं आहे.’ तेव्हा निकच्या मुलीने उत्तर दिलं, ‘तुमचे पैसे परत देण्याचा विचार करूयात.’ या वेळी निकने फसवणूक केल्याचं पीडितेच्या लक्षात आलं आणि तिने याबाबत पोलीस आणि बँकेशी संपर्क केला. यानंतर तपासाची चक्रं वेगाने फिरली असून फसवणूक झालेल्या मुलीने एका बँकेतून निकच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेली रक्कम वसूल करण्यात आली आहे, तर उर्वरित बँका त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत. तसंच पोलीस डेटिंग अॅपवरून माहिती गोळा करत आहेत. दुसरीकडे संबंधित मुलीने इतर लोकांना अशा फसवणुकीपासून सावध केलं आहे, आणि इथून पुढे अशा फसवणुकीला बळी पडणार नसल्याचं म्हटलं आहे.
हे वाचा - ‘थार’ चालवता चालवता झालं प्रेम आणि मग शुभमंगल! आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEO
अशी झाली फसवणूक - संबंधित मुलीने तिची फसवणूक कशी झाली, हेदेखील शेअर केलंय. ती म्हणते, ‘माझं आणि निकचं बोलणं सुरू झाल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर त्याने माझ्याकडे पहिल्यांदा पैसे मागितले. फॅशन डिझायनर म्हणून त्याला मोठे काम मिळालं आहे, असं सांगत त्याने 25 लाख रुपये मागितले. मी त्याला बँक आणि मित्रांकडून पैसे माग, असं सांगितल्यावर तो टाळाटाळ करू लागला. नंतर तो म्हणाला की, 10 लाखाचा जुगाड झाला, पण 15 लाख अजून कमी आहेत. मला संशय आला, पण तरीही मी त्याला पैसे दिले. त्यावेळी त्याने 10 दिवसांत पैसे परत करतो, असं आश्वासन दिलं. मात्र 10 दिवसांनंतर पैसे परत करण्याऐवजी तो विविध कारणं देऊ लागला. एवढंच नाही तर नवनवीन अडचणी सांगून त्याने माझ्याकडून आणखी पैसे घेतले.’ डेटिंग साइटवरून प्रेम झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला न भेटताही केवळ त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याला करोडो रुपये देण्याचा हा धक्कादायक प्रकार इतरांना सावध करणारा आहे. या प्रकाराची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.