लखनऊ 20 जानेवारी : खऱ्या प्रेमात सर्वकाही न्याय्य असतं, असं म्हणतात. कदाचित त्यामुळेच उत्तर प्रदेशातील एका मुलीनं प्रेमाखातर शस्त्रक्रिया करून तिचं लिंग बदलून घेतलं. संबंधित मुलीचं तिच्या मैत्रिणीवर खूप प्रेम होतं. पण आता ज्या मैत्रिणीवरील प्रेमासाठी लिंग बदलून घेतलं, त्याच मैत्रिणीनं लग्नाला नकार दिलाय. त्यामुळे लिंग बदलून घेणाऱ्या संबंधित मुलीनं थेट न्यायालयात धाव घेतली आहे.
‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात एक विचित्र प्रेमकहाणी समोर आली आहे. येथे दोन मुली एकमेकांच्या प्रेमात पडल्या. दोघींनी लग्न करण्याचं निश्चित केलं. त्यामुळे त्या दोघींपैकी सना खान नावाच्या मुलीनं दिल्लीच्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून स्वतःच लिंग बदलून घेतलं, स्वतःचे स्तन काढले, व ती मुलगा झाली. एवढचं नाही, तर तिनं स्वतःचं नावही सना खानवरून साहिल खान असं केलं. पण आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिच्या प्रेमासाठी ती सना खानवरून साहिल खान झाली, आता त्याच मुलीनं तिच्याशी लग्न करायला नकार दिला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे.
गर्लफ्रेंड फोनवर नेहमी राहायची बिझी, संतापात बॉयफ्रेंडने केलं भयानक कांड
म्हणून केली लिंग बदल शस्त्रक्रिया
याप्रकरणी पीडित साहिल खान याने सांगितलं की, ‘मी माझ्या मैत्रिणीच्या प्रेमात पडल्यानंतर लिंग बदल शस्त्रक्रिया केली. आता जिच्यासाठी हे कृत्य केलं, ती मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार नाही. तिनं माझी फसवणूक केली. पूर्वी माझे नाव सना खान होतं, आता ते बदलून मी साहिल खान केलं आहे.’
तर, पीडितेचे वकील भागवत शरण तिवारी सांगतात की, ‘संबंधित दोन्ही मुली अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होत्या, सना खान हिने दिल्लीत तिची लिंग बदल शस्त्रक्रिया केली. पण आता जिच्यासाठी ही शस्त्रक्रिया केली होती, ती मुलगी त्याच्याशी लग्न करत नाही.’
लग्नाच्या 2 दिवस आधीच नवरीने दिला बाळाला जन्म, मग..; कुटुंबीयांच्या भीतीमुळे केलं भयानक कांड
प्रकरण गेलं न्यायालयात
प्रेमात झालेल्या विश्वासघातानं साहिल खान दुखावला आहे. त्यानं तो प्रेम करीत असलेल्या संबंधित मुलीची भेट घेतली, आणि तिला दोघांनी एकमेकांना दिलेल्या आयुष्यभर एकत्र राहण्याच्या वचनाची आठवण करून दिली होती. तो म्हणाला, ‘तुझ्या प्रेमात मी मुलीचा मुलगा झालो आहे.’ पण या गोष्टीचा त्या मुलीवर काहीही परिणाम झाला नाही. ‘तू आणि मी एकत्र राहू शकत नाही,’ असं संबंधित मुलीनं सांगितलं. ‘तुला जर काही अडचण असेल तर जाऊन पुन्हा लिंग बदलून मुलापासून मुलगी होऊ शकतो,’ असंही ती मुलगी म्हणाली. हे ऐकून साहिल खूप अस्वस्थ झाला आणि त्यानं न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या एका वकिलानं सांगितलं की, ‘या पूर्वीही साहिल तिच्या मैत्रिणीचा सर्व खर्च करत असे. दोघेही पती-पत्नीसारखेच राहायचे. दोघांमध्ये खूप प्रेम होते. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर रील पोस्ट करीत असत. आता दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. याबाबत न्यायालयात खटला सुरू आहे.’
दरम्यान, सध्या जी मुलगी शस्त्रक्रिया करून मुलगा झाली आहे, तिला पुन्हा स्वतःची प्रेयसी मिळवायची आहे. जिच्यासाठी तिनं एवढा मोठा निर्णय घेतला, ती मिळावी, अशी तिची इच्छा आहे. पण आता ना तिच्या मैत्रिणीला तिच्यासोबत राहायचं आहे, व ना संबंधित मैत्रिणीचं कुटुंब दोघींच्या लग्नासाठी तयार आहे.
या प्रकरणाची जोरदार चर्चा झाशी जिल्ह्यात सुरू आहे. सध्या अधुरी असणारी ही प्रेमकहाणी पूर्ण होणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Love story