नवी दिल्ली 28 मार्च : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी पैसे लुटण्याचे नवीन मार्ग शोधत असतात. यूपीआय ते एसएमएस फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर येत असतात. नुकतंच ऑनलाइन टॉवेल ऑर्डर करताना एका वृद्ध महिलेची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. महिलेची 8.3 लाखांची फसवणूक झाली आहे. या ऑनलाइन घोटाळ्याने लोकांना हादरवलं आहे.
मीरा रोड येथील ७० वर्षीय महिला एका ई-कॉमर्स साइटवरून 1,160 रुपयांना ऑनलाइन सहा टॉवेल ऑर्डर करत होती. मात्र, ऑनलाइन पेमेंट करताना तिच्या खात्यातून 1,169 रुपयांऐवजी 19,005 रुपये कापले गेले. याची तक्रार करण्यासाठी महिलेनं संपर्क क्रमांक पाहिला आणि मदतीसाठी बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल केला. परंतु बँकेशी संपर्क होऊ शकला नाही.
थोड्याच वेळात तिला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. जो बँकेचा असल्याचा दावा करत होता आणि ऑनलाइन व्यवहाराच्या समस्येसाठी तिला मदतीची ऑफर दिली गेली. त्या व्यक्तीने तिला रिफंडसाठी अॅप डाउनलोड करण्यास सांगितलं.
महिलेने मदत मिळवण्यासाठी या व्यक्तीने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन केलं पण तिच्या खात्यातून एक लाख रुपये डेबिट झाले. हे पाहून महिलेने पोलीस ठाणं गाठलं. मात्र, दरम्यानच्या काळात तिच्या अकाऊंटमधून आणखी सुमारे 8.3 लाख रुपये काढण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Online shopping