बारा वर्षांनंतर हत्तीला दिसले आपला जीव वाचवणारे डॉक्टर, त्यानं दिलेल्या अनोख्या सलामीनं सगळेच थक्क

बारा वर्षांनंतर हत्तीला दिसले आपला जीव वाचवणारे डॉक्टर, त्यानं दिलेल्या अनोख्या सलामीनं सगळेच थक्क

डॉ.पात्रापोल मॅनीऑन नेहमीप्रमाणे एका जंगलात गस्तीसाठी जात असताना एक जंगली हत्ती त्यांच्याजवळ आला आणि विशिष्ट आवाज करत त्यानं त्यांना आपली ओळख देण्याचा (Elephant Recognised The Doctor) प्रयत्न केला.

  • Share this:

मुंबई 18 मार्च : हत्ती (Elephant) हा अतिशय बुद्धिमान आणि प्रेमळ प्राणी म्हणून ओळखला जातो. आपल्याला जीव लावणाऱ्या व्यक्तीला प्राणी कधीही विसरत नाहीत. हत्ती तर याबाबतीत अधिक चाणक्ष असतात. थायलंडमधील (Thailand) घटनेनं तर यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे. हत्ती हा थायलंडचा राष्ट्रीय प्राणी (National Animal) आहे, त्यामुळं त्याची इथं खूप काळजी घेतली जाते. हत्तींच संवर्धन व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात. इथं 3 ते 4 हजार हत्ती असून त्यापैकी निम्मे पाळीव आहेत. जंगलातील हत्तींचं संरक्षण करण्यासाठीही इथं काटेकोर प्रयत्न केले जातात. अशाच एक जंगली हत्तीच्या प्रेमळपणाचा किस्सा सध्या सर्वत्र चर्चिला जात आहे.

31 वर्षीय डॉ.पात्रापोल मॅनीऑन (Dr. Pattarapol Maneeon) या प्राण्यांच्या डॉक्टरला हा अविस्मरणीय अनुभव आला आहे. त्यांच्या कामाचा भाग असल्यानं ते नेहमीप्रमाणे एका जंगलात गस्तीसाठी जात असताना एक जंगली हत्ती त्यांच्याजवळ आला आणि विशिष्ट आवाज करत त्यानं त्यांना आपली ओळख देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यानं आपली सोंड उंचावून त्यांना सलामी दिली. सुरुवातीला डॉ. मॅनीऑन यांना हा हत्ती असं का करतो आहे हे लक्षात आलं नाही. पण त्या हत्तीच्या विशिष्ट आवाजावरून त्यांनी त्याला ओळखलं. हा तोच हत्ती होता ज्याच्यावर त्यांनी 12 वर्षांपूर्वी उपचार करून त्याचा जीव वाचवला होता. या हत्तीचं नाव आहे प्लाय थांग (Plai Thang). ही घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पाहताना या हत्तीचं नाव आणि अन्य सर्व गोष्टींची खातरजमा झाली.

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, आपण उपचार केलेल्या हत्तीनं 12 वर्षांनतर आपल्याला ओळखून प्रेमानं सलामी द्यावी यामुळं डॉ. मॅनीऑन अतिशय भारावून गेले आहेत. प्राणी किती निस्वार्थी असतात याचंच हे विलक्षण उदाहरण आहे. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी ही घटना सर्वांपर्यंत पोहोचावी अशी त्यांची इच्छा आहे.

या हत्तीची आणि डॉ. मॅनीऑन यांची पहिली भेट 2009 मध्ये झाली होती. ताप, भूक नसणे, डोळे, चेहरा, पोट आणि गळा यावर सूज, कडक झालेले पाय आणि अशक्तपणा अशी लक्षणं दिसत असलेल्या अवस्थेत त्याला फॉरेस्ट इंडस्ट्री ऑर्गनायझेशनच्या(Forest Industry Organization) हद्दीतील लाम्पाग इथल्या उपचार केंद्रात आणण्यात आलं होतं. डिपार्टमेंट ऑफ नॅशनल पार्क्स, वाइल्डलाईफ अँड प्लँट कॉन्झर्व्हेशनच्या (Department of National Parks, Wildlife and Plant Conservation) कर्मचाऱ्यांनी डॉ. मॅनीऑन यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार केले, त्याची काळजी घेतली. तो पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला जंगलात सोडण्यात आलं.

ही आठवण सांगताना डॉ. मॅनीऑन म्हणाले, प्लाय थांगला उपचारासाठी (Treatment) आणण्यात आलं तेव्हा त्याची अवस्था अतिशय गंभीर होती. तो अतिशय आक्रमक झाला होता पण त्याचं शरीर अतिशय दुबळं झालं होतं. तो इतर हत्तींशी लढण्यासाठी सक्षम नव्हता. हळूहळू तो स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिकला. दीर्घकाळ त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र तो या सगळ्यातून पूर्ण बरा झाला.’ तब्बल 12 वर्षांनतर पुन्हा त्यांची आणि प्लाय थांगची भेट झाली आणि ती त्याच्या अदभूत कृतीमुळं अविस्मरणीय झाली आहे.

Published by: Kiran Pharate
First published: March 18, 2021, 3:53 PM IST

ताज्या बातम्या