नवी दिल्ली, 7 मार्च : आज संपूर्ण राज्यभर धुलिवंदनाचा उत्सव सुरु आहे. सकाळपासून तरुणांमध्ये उत्साह आणि आनंद पहायला मिळतोय. सर्वत्र रंगाची उधळण सुरु असून सर्वजण रंगांमध्ये न्हाऊन निघाले आहेत. धुलिवंदनाच्या निमित्ताने अनेक खास व्हिडीओ समोर येत आहेत. अशातच मुंबईत लोकलमधूनही काही व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मुंबई लोकलमध्ये महिला धुळवड खेळत आहेत. लोकलमधील भर गर्दीत महिला धुलिवंदन म्हणजेच धुळवडचा आनंद घेत आहेत. एकमेकांना रंगामध्ये भरवून महिला ट्रेनमधील होळी साजरी करत आहेत. लोकलमध्येही सण साजरा करत महिला आनंद घेताना दिसतायेत.
localtrain_girl नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. होळी, धुळवडच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरात उत्साह पहायला मिळतोय. मुंबईमध्ये तर ठिकठिकाणी रंगाची उधळण सुरु आहे. लोकल आणि बसमध्येही रंग पहायला मिळतोय.
दरम्यान, हिंदू कॅलेंडरनुसार, होळीचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळी, धूलिवंदन हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आणि त्यांच्या तक्रारी विसरून, गळाभेट घेऊन आनंद साजरा करतात. धूलिवंदनाच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते, यावेळी सर्व प्रकारचे वाईट आणि नकारात्मकता मनातून काढून टाकली जाते.