मुंबई, 9 फेब्रुवारी : सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. सोशल मीडियावरही व्हॅलेंटाईन वीकचा प्रभाव दिसतोय. वेगवेगळ्या लव्हस्टोरीसंबंधी माहिती, फोटो, व्हिडिओ व्हायरल होऊ लागलेत. असाच एक पती-पत्नीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा एकमेकांसोबतच लग्न करणाऱ्या पती-पत्नीचा हा व्हिडिओ असून तो पाहिल्यानंतर ‘जोडीदारानं साथ द्यावी तर अशी’, असं तुम्हालाही वाटल्याशिवाय राहणार नाही.
घटस्फोटानंतर पुन्हा लग्न
घटस्फोटाची प्रकरणं जगभर समोर येत असतात. पण कल्पना करा, जर एखाद्या जोडप्यानं एकमेकांपासून घटस्फोट घेतला, आणि मग असं काही घडलं की दोघांनी पुन्हा एकदा लग्न केलं तर काय होईल. पण असं क्वचितच पाहायला मिळतं. असाच एक प्रकार समोर आलाय. एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीला घटस्फोट दिला होता. मात्र, त्यानंतर त्याला स्वतःच्या पत्नीबद्दल अशी गोष्ट कळली की, त्यानं पुन्हा तिच्याशी लग्न केलं. या जोडप्याची कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही घटना चीनमधील एका शहरातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार, या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची कहाणी चिनी सोशल मीडियावर व्हायरल झालीय.
वृत्तानुसार या जोडप्यामध्ये वाद झाला, व त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही दिवसांनी पतीला कळलं की दोन आठवड्यांपूर्वी त्याच्या पत्नीला ऍप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार झालाय. मग त्या व्यक्तीनं पुन्हा एकदा त्याच्या पत्नीला साथ देण्याचा निर्णय घेतला, व तिला आयसीयूमध्ये अॅडमिट करण्याच्या एक दिवस अगोदर तिच्याशी पुन्हा लग्न केलं.
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
व्हायरल झालेला हा व्हिडिओ विवाह नोंदणी कार्यालयाबाहेरचा आहे. त्यात एक व्यक्ती सांगताना दिसत आहे की, ‘लग्न झाल्यानंतर नवीन जोडपं त्यांचे लग्न फुलं आणि वाईन देऊन साजरे करतात. पण आमच्यासमोर वास्तव वेगळं आहे. पत्नीचा जीव वाचवण्यासाठी मी हॉस्पिटलच्या फेऱ्या मारत आहे. माझा आणि माझ्या पत्नीचा रागाच्या भरात घटस्फोट झाला होता. पण माझ्या पत्नीला गंभीर आजार असल्याचं समजलं व मी तिच्याशी पुन्हा लग्न केलं.’
दरम्यान, प्रेमामध्ये एकमेकांच्या चांगल्या, वाईट सवयी माहिती असतानाही एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलं जातं. पण संकटाच्या काळात काहीजण स्वतःच्या जोडीदाराला एकटं सोडून गेल्याचे प्रकार समोर आलेत. मात्र, चीनमध्ये घटस्फोट झाल्यानंतर पत्नीला गंभीर आजार असल्याचे कळताच तिच्यासोबत पुन्हा लग्न करण्याची हिंमत एका व्यक्तीनं दाखवल्यानं हा प्रकार कौतुकास्पद आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Couple, Divorce, Valentine week