लखनऊ 16 जून : कोरोना (Coronavirus) महामारी आपल्या उच्चांकावर असताना देशात अनेक धक्कादायक दृश्य पाहायला मिळाली. कोलमडलेल्या आरोग्य व्यवस्थेमुळे या काळात नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावं लागलं. याच काळात उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आगरामधील (Agra) एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये एक महिला ऑटोमध्ये बसलेली होती आणि ती आपल्या तोंडानं श्वास देऊन पतीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती. महिलेच्या पतीला चार रुग्णालयांनी बेड नसल्याचं सांगत दाखल करून घेण्यास नकार दिला होता. तिच्या पतीला श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र, प्रचंड धडपड करुनही ही महिला आपल्या पतीला वाचवू शकली नाही.
हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करत महिलेला सहानुभूती देण्याचा प्रयत्न केला मात्र आजपर्यंत कोणीही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, की ही महिला नेमकी कोण होती आणि पतीच्या मृत्यूनंतर तिची काय अवस्था आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेचं नाव रेनू सिंघल असं आहे. ती आगरामधील आवास विकास कॉलनीतील एका 2,500 रुपये भाडं असणाऱ्या खोलीत राहाते. तिची 16 वर्षाची एक मुलगी असून ती सध्या दहावीमध्ये शिकते. महिलेचा पती पेठा विकण्याचं काम करायचा. महिलेनं सांगितलं, की सध्या रोजच्या खर्चासाठीही तिच्याकडे पैसे नाहीत. लॉकडाऊनमुळे तिलाही नोकरी मिळत नाही. त्यामुळे, तिचं कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.
साडेचार वर्षाच्या प्रिन्सनं पकडलेत 100 विषारी साप, त्या एक प्रसंगानं बनवलं धाडसी
रेनू सिंघल यांनी सांगितलं, की त्यांच्या पतीचं नाव रवी होतं. ते 47 वर्षांचे होते. 20 एप्रिलला त्यांना ताप आला होता. 23 एप्रिलपर्यंत त्यांची प्रकृती खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा महिलेनं ऑटो बोलावली आणि आपल्या पतीला घेऊन ती जवळच्याच एका रुग्णालयात गेली. मात्र, तिथे बेड मिळाला नाही. महिलेला सरोजनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगण्यात आलं. मात्र, याठिकाणीही महिलेला बेड मिळाला नाही. यानंतर तिनं आणखी दोन रुग्णालयांमध्ये प्रयत्न केले मात्र कोणीही तिच्या पतीला दाखल करुन घेतलं नाही. यादरम्यान पतीला श्वास घेण्यास जास्तच त्रास होऊ लागल्यानं महिलेनं आपल्या तोंडानं त्याला श्वास पुरवला. मात्र, ही महिला आपल्या पतीचा जीव वाचवू शकली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Viral photo