प्राणी व मनुष्य यांच्यात काही गोष्टींमध्ये साधर्म्य पाहायला मिळतं. अनेक भावना मनुष्य व प्राण्यांमध्ये सारख्या असतात. विशेषतः आई-मुलाचं नातं जसं माणसांमध्ये दृढ असतं, तसंच ते प्राण्यांमध्येही असतं. पिलाला संकाटातून वाचवणारी हत्तीण, दोरीवरून पिलांना घेऊन नदी पार करणारी माकडीण यांच्याप्रमाणे सर्वच प्राणी आपापल्या पिलांचं रक्षण करतात. वेळप्रसंगी त्यासाठी समोरच्यावर हल्लाही करतात. मात्र जिथे नियम असतात, तिथे अपवादही असतात. असंच एक उदाहरण माशांच्या बाबतीत आढळून आलंय. एका विशिष्ट प्रकारचे मासे अंडी घालून आपल्याच पिलांना खाऊनही टाकतात. माशांमधील या विचित्र प्रकाराबाबत मिशिगन युनिव्हर्सिटीत संशोधन सुरु आहे. ‘गॅजेट 360’नं याबाबत सविस्तर वृत्त दिलंय. सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांना एका संशोधनादरम्यान माशांसंदर्भात वेगळी माहिती लक्षात आली. समुद्रातले सिक्लिड मासे अंडी घालून त्यांना खातात. हे मासे अंडी घातल्यानंतर जवळपास 2 आठवडे त्यांना तोंडात ठेवतात आणि त्यापैकी 40 टक्के पिलांना खाऊन टाकतात. काही वेळेला तर अंडी परिपक्व होत आलेली असतानाच मासे त्यांना खाऊन टाकतात. अंड्यातून छोटे मासे बाहेर पडण्याची शक्यता असताना त्यांच्या आईनं त्यांना खाऊन टाकणं हे विचित्र असून त्यामागे काही विशिष्ट कारण आहे का, याचा शोध संशोधक घेत आहेत. त्यासाठी शास्त्रज्ञांनी माशांच्या प्रजननासंबंधीच्या सवयी जाणून घेतल्या. त्याकरता एका लॅबमध्ये संशोधन करण्यात आलं. त्यातल्या 80 माशांनी अंडी घालून जवळपास 2 आठवडे त्यांना तोंडात ठेवलं. या काळात त्यांनी नेहमीसारखं खाल्लं नाही. स्वतःची अंडी खाऊन माशांना त्यातून काही मिळत असावं, असं संशोधकांना वाटतंय. आरोग्यासाठी काही आवश्यक घटक त्यातून त्यांना मिळताहेत असंही संशोधकांना वाटतंय. मात्र इतके दिवस अंड्यांना तोंडात ठेवून हे मासे काही न खाता अनेक दिवस जगू शकतात, ही गोष्ट विस्मयकारक आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हेही वाचा - Winter Health Tips : जादूसारखे काम करतील हे 5 तेल, सांधेदुखीची समस्या चुटकीसरशी होईल दूर समुद्रात अनेक प्रकारचे मासे असतात. त्यापैकी शार्क हा सर्वांत मोठा आणि धोकादायक मासा असतो. लाखो वर्षांपूर्वी व्हेलपेक्षा मोठा असलेला मेगालोडन नावाचा एक शार्क 5 घासांमध्ये व्हेलसारख्या माशांना खाऊ शकत होता. हा शार्क पोट भरल्यावर अनेक महिने समुद्रात काही न खाता फिरू शकायचा. संशोधकांनी मेगालोडन शार्कची 3D प्रतिकृती बनवली आहे. त्यावरून त्यांनी हे निष्कर्ष काढले आहेत. ही प्रतिकृती बनवण्यासाठी माशांच्या जीवाश्माचा उपयोग केला. मेगालोडन मासा 50 फूट (16 मीटर) लांब होता. एका शाळेच्या बसपेक्षा त्याचा आकार मोठा होता. सध्या समुद्रात आढळणाऱ्या पांढऱ्या शार्कपेक्षा मेगालोडन शार्क आकारानं दुप्पट किंवा तिप्पट होता. त्याचे जबडे खूप मोठे होते. त्यामुळे तो सहज कोणालाही खाऊ शकत असे. सागरी जीवांबाबत अनेक रहस्य अजूनही उलगडलेली नाहीत. त्यासाठी संशोधक सातत्यानं प्रयत्न करत आहेत. त्यादृष्टीनं हे संशोधन महत्त्वाचं ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.