मुंबई,13ऑक्टोबर- कोरोना (Coronavirus Pandemic) संकटामुळे पर्यटन, हॉटेलिंग आदी व्यवसायांना मोठा फटका बसला. अनेकांचे उद्योगधंदे ठप्प झाले; पण या संकटातही अनेकांनी संधी शोधली आणि नवीन व्यवसाय सुरू करून परिस्थितीवर मात केली. आता हळूहळू कोरोनाचा विळखा सैलावत आहे; मात्र त्याचवेळी जगभरातल्या अनेक देशांमध्ये चक्रीवादळामुळे अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक आपत्तीने थैमान घातलं आहे. आपल्या देशातही सध्या अनेक ठिकाणी अतीवृष्टी, पूर यांचा सामना करावा लागत आहे. तसंच थायलंडमध्येही (Thailand) अनेक ठिकाणी पूर आला आहे. अशा संकटातही संधी शोधली आहे ती एका रेस्टॉरंटच्या (Restaurant) मालकिणीने. पुराच्या पाण्यातही (Flood) रेस्टॉरंट सुरू ठेवण्याचा तिचा निर्णय इतका यशस्वी ठरला आहे, की बघता बघता हे रेस्टॉरंट सोशल मीडियावरून जगभर प्रसिद्ध झालं आहे.
'झी न्यूज'नं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही आठवड्यांपासून थायलंडच्या उत्तर आणि मध्य प्रांतांना पुराचा फटका बसला असून, राजधानी बँकॉकमधल्या (Bangkok) प्रसिद्ध चाओ फ्राया (Chao Fria) नदीला प्रचंड पूर आला आहे. या नदीच्या काठी अनेक व्यवसाय आणि प्रेक्षणीय स्थळं आहेत. या नदीच्या काठी नॉन्थाबुरी भागात टिटिपॉर्न जुतिमानन (Titiporn Jutimanon) हिच खूप वर्षांपासून रिव्हरसाइड हे रेस्टॉरंट आहे. कोरोना साथीमुळे टिटिपॉर्नचं रेस्टॉरंट आधीच तोट्यात गेलं होतं. त्यातच नदीला आलेल्या या पुराने संकटात आणखी भर पडली. पुरामुळे या भागातल्या अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे अनेकांनी आपली दुकानं बंद केली, तर काहींनी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. टिटिपॉर्ननं मात्र एक जगावेगळाच निर्णय घेतला. तिने पुराचा सामना करण्याचा निर्णय घेतला आणि इतरांप्रमाणे आपलं रेस्टॉरंट बंद न करता ते सुरूच ठेवण्याचं ठरवलं. तिचा हा अजब निर्णय चमत्कार घडवणारा ठरला. पुराच्या पाण्यातही सुरू असलेलं हे रेस्टॉरंट लोकांच्या आकर्षणाचं केंद्र बनलं.
(हे वाचा;पैसे वाचवून कपलनं खरेदी केलं नवं घर; किचनमधील कपाट उघडताच बसला धक्का)
नदीतून येणाऱ्या लाटांवर हे रेस्टॉरंट तरंगत असल्याचा भास होतो. लोकांना याचं प्रचंड आकर्षण वाटू लागलं. त्यामुळे नदीतून जाणाऱ्या बोटीदेखील इथे थांबू लागल्या आणि प्रवासी या रेस्टॉरंटमधल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ लागले. बघता बघता टिटिपॉर्नचं हे पाण्यावरचं रेस्टॉरंट चांगलंच लोकप्रिय झालं. सोशल मीडियावरही ते व्हायरल झालं. टिटिपॉर्नच्या या रेस्टॉरंटमध्ये पाण्यात अर्धवट बुडलेल्या खुर्च्यांवर बसून लोक आनंदाने इथल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(हे वाचा:महिला घरातच बनवत होती बोगस कूपन्स, आतापर्यंत तब्बल 240 कोटींची केली फसवणूक)
कोविड-19मुळे (Covid-19) लॉकडाउनच्या काळात बंद असणारं रेस्टॉरंट आता पुरात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं चांगलंच चालू लागल्यानं टिटिपॉर्न खूपच आनंदी आहे.संकटाचं रूपांतर संधीत करणं ही उक्ती टिटिपॉर्न हिनं प्रत्यक्षात आणून दाखवली असून, जगभरातील अनेकांसाठी ती प्रेरणा ठरली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.