अभिषेक माथुर, प्रतिनिधी हापुड, 4 जून : कागज चित्रपटासारखाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील हापुडमधून समोर आला आहे. येथे एका महिलेला मृत घोषित करण्यात आले होतो. यानंतर आता ती स्त्री स्वतःला कागदावर जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. हापूड ग्रामपंचायत सचिवाने अल्लीपूर गावात राहणाऱ्या एका वृद्ध महिलेला मृत दाखवून तिची पेन्शन बंद केले. यानंतर वृद्ध महिलेने जिल्हा दंडाधिकार्यांच्या न्यायालयात जाऊन ग्रामपंचायत सचिवांची तक्रार जिल्हा दंडाधिकार्यांकडे केली आहे. अल्लीपूर गावातील रहिवासी असलेल्या संता या वृद्ध महिलेला राज्य सरकारच्या वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेंतर्गत दरमहा पेन्शन मिळत होती. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून महिलेचे पेन्शन अचानक येणे बंद झाले. वृद्ध महिलेने ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सचिवांना भेटून तिची पेन्शन थांबवण्याचे कारण विचारले असता सचिव मनजीत सिंग यांनी चौकशी केल्याचे सांगितले.
यामध्ये वृद्ध महिला संता आता या जगात नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे. सचिवांनी पडताळणी न करताच अहवालावर अंतिम शिक्कामोर्तब केले आणि वृद्ध महिलेला मृत दाखवून पेन्शन बंद करण्याचा अहवाल पोर्टलवर अपलोड केला. वृद्ध महिला आपला मुलगा सूरज सिंहसह ग्रामपंचायत सचिवांकडे गेली आणि तिने अनेक वेळा ती जिवंत असल्याचे पुरावे दिले. ती जिवंत आहे, तिची पेन्शन सुरू करावी, अशी विनंती ग्रामपंचायत सचिवांना केली. मात्र, वृद्ध महिलेची कोणतीही सुनावणी झाली नाही. तर दुसरीकडे पेन्शन बंद झाल्यामुळे वृद्ध महिलेला खर्च भागवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर या प्रकाराला वैतागलेल्या संता या महिलने आपल्या मुलासह जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत जिल्हाधिकारी प्रेरणा शर्मा यांची भेट घेतली. याठिकाणी या वृद्ध महिलेने डीएमकडे तक्रार केली की ती जिवंत आहे, परंतु ग्रामपंचायत सचिवांनी तिला मृत असल्याचे दाखवून तिची पेन्शन बंद केली. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर ग्रामसचिव मनजीत सिंह म्हणाले की, तपासादरम्यान वृद्ध महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांकडून मिळाली होती, मात्र त्यात चूक झाली होती ज्यामुळे वृद्ध महिलेचे पेन्शन बंद झाली. मात्र, आता हा अहवाल दुरुस्त करण्यात आला असून लवकरच वृद्ध महिलेला पेन्शन मिळण्यास सुरुवात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.