अनुज गौतम, प्रतिनिधी सागर, 13 जुलै : पाल दिसली की, असे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतात ज्यांना किळस वाटते. बाकी बहुतेकजणांना आजूबाजूला पाल असणं हे नैसर्गिक वाटतं, त्यात काही भीती किंवा वेगळेपण जाणवत नाही. परंतु पाल ही साधारणतः एका शेपटाची असते. फार फार तर दोन शेपटांची पाहायला मिळते. कदाचित पालीला दोन शेपूट असतात हे अनेकजणांना माहितही नसेल, परंतु दोन नाही तर चक्क तीन शेपटांचीही पाल असते. वाटलं ना आश्चर्य? तीन शेपटांच्या पालीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ मध्यप्रदेशच्या सागर भागातील पंडापुराचे रहिवासी रामचरण पटेल यांच्या घरचा आहे. भिंतीवर तीन शेपटांची पाल दिसताच त्यांच्या नातवाने तिला कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केलं.
याबाबत किटक तज्ज्ञ प्राध्यापिका वर्षा शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही एक सर्वसामान्य पाल असते. वैज्ञानिक भाषेत तिला ‘हेमिडॅक्टाएलस’ म्हणतात. मुळातच पालींमध्ये तुटलेलं शरीर पुनर्जिवित करण्याची क्षमता असते. जेव्हा एखाद्या पालीवर हल्ला होतो, तेव्हा ती हल्ला झालेला भाग शरीरापासून वेगळा करते आणि कालांतराने त्याच जागी पुन्हा नवा भाग मिळवते. म्हणूनच कधी आपण एखाद्या पालीला मारण्याचा प्रयत्न केला, तर बऱ्याचदा तिचं शेपूट हातात येतं आणि वरील भाग निसटतो. क्या बात है! चहा प्या आणि कपही खा; पठ्ठ्याने शोधली फक्कड आयडिया वर्षा शर्मा सांगतात, ‘जेव्हा पालीवर हल्ला होतो, तेव्हा ती स्वतःच्या बचावासाठी शेपूट सोडून पळ काढते. काही काळानंतर तिचं शेपूट पुन्हा तयार होतं. काहीवेळा एका शेपटाच्या जागी दोन शेपूट येतात आणि फार क्वचित असंही घडतं की, पालीचे तीन शेपूट तयार होतात. अशावेळी घाबरून जाण्याची गरज नसते. ही पाल अगदी इतर पालींसारखीच असते’, असं त्या म्हणाल्या. दरम्यान, तीन शेपटांची पाल दिसणं हा शुभ संकेत मानला जातो. याबाबत वर्षा शर्मांनी सांगितलं, ‘शुभ, अशुभ माहित नाही, मात्र अशी पाल दिसल्यास घाबरून जाऊ नये.’