मुंबई, 21 डिसेंबर : आजकाल आपण पत्र लिहिणं विसरूनच गेलो आहोत कारण मोबाइल (Mobile)आल्यामुळे लोकांशी संपर्क साधणं अगदी सोपं झालं आहे. फोन करून प्रत्यक्ष आवाज ऐकणं शक्य झालं आहे. तसेच आता व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम आदी वेगवेगळ्या इन्स्टंट चॅट अॅप्समुळे (Instant Chat Apps) लिखित स्वरूपात संदेश पाठवून संभाषण करणं अगदी सर्वसामान्य बाब झाली आहे. त्यामुळे आता एसएमएस म्हणजे शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस अर्थात लघु संदेश सेवा (SMS) हा प्रकार जवळजवळ विस्मृतीतच गेल्यासारखा झाला आहे. आता आपल्याला कंपन्याकडून मेसेजेस येतात किंवा अगदीच अपरिहार्य कारणामुळे आपल्याला कोणाला मेसेज पाठवावा लागतो किंवा कोणाचा तरी येतो, तेव्हा या सुविधेची आठवण होते. अनेकांना तर गेल्या काही दिवसांतच काय वर्षभरातदेखील एखादा एसएमएस आल्याचं आठवत नसेल. जेव्हा मोबाइल अगदी नवीन होता, ते सुरुवातीचे दिवस आठवले तर एसएमएसचे महत्त्व लक्षात येईल. त्या काळी कोणाला फोन केला किंवा आला तरी पैसे लागत असत, त्यामुळे ही शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिस अर्थात एसएमएस अधिक उपयोगाची सुविधा होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल; पण जगातील पहिला एसएमएस जवळपास 30 वर्षांपूर्वी पाठवण्यात आला होता. आज या जगातील पहिल्या एसएमएसचा लिलाव (Auction) होणार असून, त्याला 1 ते 2 कोटी रुपयांपर्यंतची किंमत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
जगातील हा पहिला एसएमएस साधारण 30 वर्षांपूर्वी म्हणजे 1992 मध्ये व्होडाफोनच्या (Vodafone) एका ब्रिटिश कर्मचाऱ्याने (British Employee) पाठवला होता. या कर्मचाऱ्याचे नाव होते नील पापवोर्थ. प्रोग्रामर असलेल्या नील यांनी 3 डिसेंबर 1992 रोजी संगणकावरून कंपनीचे संचालक रिचर्ड जार्विस यांना हा संदेश पाठवला होता. या पहिल्या टेक्स्ट मेसेजमध्ये 'मेरी ख्रिसमस' (Merry Christmas) अशी 14 अक्षरं होती. नील यांनी रिचर्ड जार्विस यांना त्यांच्या ऑर्बिटल 901 या मोबाइल हँडसेटवर (Orbital 901 Mobile Handset) हा एसएमएस पाठवला.
Did you know the world's #1stSMS was a simple "Merry Christmas"?
Sent 30 years ago via the #Vodafone network, it's been transformed into a #NFT by @vodafone_de, so it can be auctioned to raise funds for our partners at #UNHCR, helping to build a better future for @refugees. pic.twitter.com/NDis7WEHxC — Vodafone Foundation (@VodafoneFdn) December 14, 2021
याबाबत 2017 मध्ये एकदा माहिती देताना नील यांनी सांगितलं होतं की, 1992 मध्ये त्यांनी हा एसएमएस पाठवला तेव्हा तो इतका लोकप्रिय होईल याची त्यांना कल्पनादेखील नव्हती. त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं होतं की त्यांनी जगातील पहिला लिखित संदेश मोबाइल हँडसेटवर पाठवला आहे. 1992 मध्ये पहिला संदेश पाठवण्यात आल्यानंतर ही सेवा सगळीकडे उपलब्ध झाली, त्यानंतर 1995 पर्यंत, दर महिन्याला सरासरी केवळ 0.4 टक्के लोक एसएमएस पाठवत होते.
पॅरिसमधील (Paris) एगट्स ऑक्शन हाउसमध्ये आज दुपारी 3 वाजता या पहिल्या एसएमएसचा लिलाव होणार असून, जगभरातील लोक यावर बोली लावू शकतील. या एसएमएसला 1 ते 2 लाख पौंड म्हणजे साधारण 1 ते 2 कोटी रुपये किंमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या 'मेरी ख्रिसमस' संदेशात एकूण 14 अक्षरे असून, 2 कोटी रुपयांना याचा लिलाव झाला असे गृहीत धरले तर प्रत्येक अक्षराची किंमत सुमारे 14.29 लाख रुपये असेल. या एसएमएसच्या लिलावातून जे काही पैसे मिळतील, ते संयुक्त राष्ट्राच्या (UN) युनायटेड नेशन हाय कमिशनर फॉर रेफ्युजी (UNHCR) या निर्वासितांसाठीच्या संस्थेला दिले जातील, असं व्होडाफोननं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.