टोकियो, 23 एप्रिल - रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine War) सुरू असलेल्या युद्धादरम्यान आता रशिया आणि चीनच्या (china) युद्धनौका जपानजवळ (Japan) दिसल्या आहेत. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी ही माहिती दिली. संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे की, प्रथमच रशियन खासगी जहाजं आणि युद्धनौका देशाच्या जवळ दिसल्या आहेत. यासोबतच चीनची जहाजंही जपानच्या जवळ आढळून आली आहेत. आपल्या निवेदनात संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, तीन नौदल युद्धनौकांसह सहा रशियन जहाजं नैऋत्य जपानमधील सुशिमा सामुद्रधुनीतून गेली आहेत. ही जहाजं पूर्व चीन समुद्रातून जपानच्या समुद्रापर्यंत गेली. नैऋत्य जपानमधील अमामी-ओशिमा बेटाजवळून प्रवास केल्यानंतर बुधवारी चिनी नौदल टोही जहाज पूर्व चिनी समुद्रातून प्रशांत महासागराकडे रवाना झाल्याचीही मंत्रालयाने पुष्टी केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
यापूर्वी जपानने युक्रेनला मदतीचा हात पुढे केला होता. रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी, जपानने युक्रेनला गॅस मास्क, हॅझमॅट सूट (धोकादायक सामग्री संरक्षण सूट) आणि ड्रोन पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचे संरक्षण मंत्री नोबुओ किशी यांनी मंगळवारी सांगितलं की, युक्रेन सरकारनं जपानला या सर्व वस्तू पाठवण्याची विनंती केली आहे. युक्रेनच्या विनंतीनुसार, जपान रासायनिक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सर्व आवश्यक उपकरणं पाठवत आहे. दरम्यान, जपानच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय की, आता जपानच्या बेटांच्या समूहाच्या आसपास चीनी आणि रशियन जहाजांच्या वाढत्या सक्रिय हालचाली आणि ऑपरेशनवर लक्ष ठेवलं जात आहे. या जहाजांबाबत आपण खबरदारी घेत असल्याचं जपानने म्हटले आहे.
हे वाचा - Ukraine War: बुचानंतर आता मारियुपोलजवळ सापडली 9000 मृतदेहांची सामूहिक कबर
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियन ऊर्जा कंपनी गॅझप्रॉम पीजेएससीशी संबंधित तीन जहाजांसह विनाशिका आणि तीन रशियन नौदलाची जहाजे होती. संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त कर्मचारी अधिकारी म्हणाले, "रशियन खासगी जहाजांनी युद्धनौकांसह प्रवास करण्याची घटना दुर्मीळ आहे." डन्झो बेटाच्या पश्चिमेला सुमारे 80 किलोमीटर अंतरावर मंगळवारी सकाळी 9 वाजता रशियन जहाजं पहिल्यांदा दिसली. हे सर्व युद्धाची व्याप्ती वाढण्याचे संकेत मानले जाऊ शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, Japan, Russia Ukraine