मुंबई, 17 एप्रिल : हिंदवी स्वराज्य संस्थापक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे. त्यांच्या पराक्रमाची कीर्ती जगभरात पसरली आहे. परदेशात अनेक ठिकाणी त्यांचे पुतळे आहेत. त्यांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या विषयीचं साहित्यही उपलब्ध आहे. मात्र, कधी-कधी पराक्रमाची आणि लोकप्रियतेची जाणीव नसल्यामुळे परदेशात छत्रपती शिवाजी महाराजांना योग्य तो सन्मान मिळत नाही. अशीच घटना लंडनमधील एका वस्तू संग्रहालयात घडली आहे. मात्र, एका मराठी मुलीनं संग्रहालय व्यवस्थापनाला आपली ही चूक दुरूस्त करण्यास भाग पाडलं आहे. ‘मिड डे’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. नेमकं काय घडलं? 23 वर्षीय वनश्री शेडगे या महाराष्ट्रायीन तरुणीनं लंडन भेटीदरम्यान 31 मार्च रोजी वव्ही अँड ए संग्रहालयाला भेट दिली होती. त्यामध्ये तिने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रथमपुरुषी एकेरी स्वरूपात उल्लेख करणारा डिस्प्ले बोर्ड पाहिला. वनश्रीनं दिलेल्या माहितीनुसार, संग्रहालयातील खोली क्रमांक 41 मधील (दक्षिण आशिया) वाघनखे या शस्त्राचं वर्णन करणाऱ्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी फक्त शिवाजी असा उल्लेख आहे. ही बाब वनश्री आणि तिच्या दोन्ही बहिणींना खटकली. त्यांनी ही बाब व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय घेतला.
“वाघनखे: 1659 मध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या बहाण्यानं विजापूरहून पाठवलेल्या दूताला खाली पाडून मराठा शासक शिवाजी एका हत्येच्या प्रयत्नातून वाचले. बचावासाठी त्यांनी हे शस्त्र वापरलं होतं असा दावा केला गेला आहे,” अशी माहिती संग्रहालयातील डिस्प्ले बोर्डवर लिहिलेली आहे. ही माहिती वाचल्यानंतर वनश्री आणि तिच्या बहिणी हेल्प डेस्क काउंटरवर गेल्या आणि फीडबॅक फॉर्मची मागणी केली. वनश्री म्हणाली, “हेल्प डेस्कवर असलेल्या महिलेनं आम्हाला फॉर्मची मागणी करण्याचं कारण विचारले. आम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी स्वरुपात उल्लेख असल्याबद्दल तिला सांगितलं. त्यानंतर तिने लगेच एक व्ही अँड ए कॉमेंट्स कार्ड आमच्याकडे दिलं.” खरा मावळा! 27 वर्षांपासून एक पैसा न घेता महाराजांची सेवा करणारे मेहबूब हुसेन, Video “महाराज हे माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांना भारतामध्ये कधीही एकेरी नावानं संबोधलं जात नाही. हा त्यांचा आणि आपल्या भारत देशाचा अनादर आहे. त्यामुळे संग्रहालयानं डिस्प्ले बोर्डवरील नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं करावं.” अशी मागणी वनश्रीनं यावेळी केली मागणी झाली मान्य संग्रहालयानं वनश्रीच्या फीड बॅक फॉर्मला तत्परतेनं रिप्लाय दिला आहे. याबाबत तिनं सांगितलं. “31 मार्च रोजी मी फॉर्ममध्ये सूचना लिहिली होती. त्यात माझा ईमेल आयडीदेखील होता. 5 एप्रिल रोजी मला संग्रहालय प्राधिकरणाकडून एक ईमेल प्राप्त झाला. एका क्युरेटरनं मी दिलेली सूचना मान्य केली आणि मी सुचवलेले बदल केले जातील असं आश्वासनही दिलं.” स्वराज्यातील किल्ल्यांसाठी शिवाजी महाराजांनी लिहिलेलं दुर्मीळ पत्र! पाहा Photos म्युझियममधील आशिया विभागाचे सीनिअर क्युरेटर दिवियान पटेल यांनी वनश्रीला मेल पाठवला आहे. “आम्ही 2024 मध्ये संपूर्ण नूतनीकरणासाठी गॅलरी बंद करणार आहोत आणि सर्व लेबल्स पुन्हा लिहून आणि अपडेट करणार आहोत. आमचा कोणाचाही अनादर करण्याचा हेतू नाही. आम्ही तुमची सूचना विचारात घेतली आहे,” असं मेलमध्ये सांगण्यात आलं आहे. इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट असलेल्या वनश्रीनं संग्रहालयाच्या कृतींचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली, “लंडनमधील संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी तत्परतेनं काम केलं आणि बोर्ड बदलण्याबाबत आम्हाला आश्वासनही दिलं. यूकेची संस्कृती आणि दृष्टिकोन, विशेषत: संग्रहालय प्राधिकरणांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.” वनश्रीनं व्ही अँड ए म्युझियमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ती म्हणाली, “आवश्यक बदल केल्यावर, मला त्याबद्दलची माहिती देणारा ईमेल येईल अशी आशा आहे.” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे झाला होता. योगायोगाने वनश्री समीर शेडगे ही रायगड जिल्ह्यातील रोहा या शहरातील राहणारी आहे.