ट्रम्प यांच्यापुढे विजयासाठी आहे एकमेव मार्ग; US Election मधले कळीचे 5 मुद्दे

ट्रम्प यांच्यापुढे विजयासाठी आहे एकमेव मार्ग; US Election मधले कळीचे 5 मुद्दे

US Presidential Election 2020 मध्ये बाजी मारण्यासाठी राष्ट्राध्यक्ष कुठलं Trump Card वापरणार? अमेरिकन निवडणूक समजून घ्या या 5 कळीच्या मुद्द्यांसह...

  • Share this:

वॉशिंग्टन, 3 नोव्हेंबर : जगातली सर्वात मोठी आणि बलशाही लोकशाही असलेल्या अमेरिकेचं नेतृत्व कुणाच्या हाती जाणार हे पुढच्या काही तासांत स्पष्ट होईल. जगातील सर्वांत जुन्या लोकशाही देशातील  जनता 3 नोव्हेंबरला आपले नवे राष्ट्राध्यक्ष (US Presidential election 2020) निवडणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4.30 वाजता अमेरिकेत मतदान सुरू होईल. आतापर्यंत 55 टक्के म्हणजेच 9 कोटी मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. यावरून मतदानात उत्साह असल्याचं स्पष्ट होतं. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन (Joe Biden) यांच्यात चुरशीची लढत होण्याची चिन्हं आहेत. अमेरिकी निवडणुकीचं (American election) खास वैशिष्ट्य म्हणजे सर्वाधिक मतं मिळवूनही उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागू शकतो. गेल्या आठवड्यातील सर्वेक्षणानुसार चार राज्यांमध्ये बायडेन यांनी आघाडी घेतली आहे.

ठळक मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया ही निवडणूक कशी होणार तेल आणि सध्याचे अध्यक्ष ट्रम्प यांना पुन्हा विजयी व्हायचं असेल तर त्यांच्यासमोर एकमेव मार्ग आहे. तो कोणता ते शेवटच्या मुद्द्यावर गेल्यावर कळेल. हे 5 आहेत या वेळच्या निवडणुकीतले कळीचे मुद्दे. मुद्दाम महत्त्वानुसार उलट्या क्रमाने देत आहोत.

5. सिनेटचं महत्त्व

विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा विजयाची आशा आहे. परंतु सर्वेक्षणानुसार चार महत्त्वाच्या स्विंग स्टेट्समध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकले आहे. सिनेटसाठीची निवडणूक यात महत्त्वाची ठरणार आहे. डेमॉक्रॅटिकच्या खात्यात 4 ते 6 जागा पडतील आणि ते ताबा मिळवतील अशी चिन्हं आहेत. जो बायडेन निवडून आले तर त्यांच्या डेमॉक्रॅटिक पक्षाला बहुमतासाठी तीन जागा जिंकाव्या लागतील. ट्रम्प यांची फेरनिवड झाल्यास त्यांना चार जागा लागतील. राजकीय पत्रकार जेसिका टेलर यांच्या मते, डेमॉक्रॅटिकला 2 ते 7 जागा मिळतील आणि रिपब्लिकनला सत्ता गमवावी लागेल. रिपब्लिकनची कोलोरॅडो आणि अरिझोनातील जागा गमावल्यातच जमा आहेत. पेन्सिल्व्हेनिया, फ्लोरिडा, अॅरिझोना आणि व्हिस्कॉन्सिनमध्ये तर मोठ्या फरकाने बायडेन यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सिनेटच्या निवडणुकीवर सगळी मदार असल्याचे दिसते.

4. Coronavirus हाच निवडणूक प्रचाराचा मुद्दा

ट्रम्प यांनी किती प्रचारसभा घेतल्या आणि कोरोनाशी मुकाबला केल्याचे किती दावे केले हा भाग अलाहिदा. परंतु व्हायरसने त्यांचे दावे फोल असल्याचेच दाखवून दिले आहे. गेल्या शुक्रवारी 99 हजार नवे रुग्ण आढळून आले. विषाणूचा फैलाव झाल्यापासूनचा एका दिवसातला हा सर्वांत मोठा आकडा ठरला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्येच्या सात दिवसांपैकी सहा दिवस ऑक्टोबर महिन्यातले आहेत.  फेब्रुवारीपर्यंत कोरोनामुळे अमेरिकेत 4 लाख लोकांचे बळी जातील असा अंदाज बांधला जात आहे. तेव्हा ही निवडणूक कोरोनाच्या मुद्द्यावरच लढली जात असल्याचं स्पष्ट होतं. ट्रम्प यांच्याकडून काहीही दावे केले जात असले तरी कोरोनाचा कहर किती पसरला आहे यावर त्यांच्याच पक्षातले आणि त्यांचेच निकटवर्तीय बोलत आहेत. त्यामुळे वस्तुस्थिती काय ते स्पष्ट होते. इतके दिवस कोरोनाबाबत ट्रम्प यांची पाठराखण करणारे फ्लोरिडातील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर रिक स्कॉट, व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोज यांनीही जाहीरपणे कोरोना विषाणू पसरत असून तो रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

3. अर्ली व्होट्समध्ये दडलीय खरी कहाणी

अर्ली व्होट्स आणि मेलद्वारे जवळपास 91 मिलियन मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत या वेळचा हा आकडा कमालीचा वाढला असून, दोन तृतीयांश मतदानाचा टप्पा गाठल्याचे यातून दिसते. 35 राज्यांनी मतदानाचा हाफ वे मार्क मागे टाकला आहे. टेक्सास आणि हवाईमध्ये मतदानातील वाढ झालेली आहे. टेक्सास, जॉर्जिया, नॉर्थ कोरोलिना, नेवाडा, फ्लोरिडा, अॅरिझोना, कोलोरॅडो, व्हिस्किन्सन, लोवा, मिशिगन, मिन्नेसोटा आणि नेब्रास्कामध्ये मतदानात वाढ झाली आहे. या अर्ली व्होट्सची राज्यनिहाय वाढ पाहता जो बायडेन यांची बाजू भक्कम झाल्याचं दिसतं. प्रत्यक्ष मतदानात ट्रम्प यांचं भवितव्य ठरणार आहे.

2. बायडेन यांची बाजू भक्कम?

अमेरिकी निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे इलेक्टोरल व्होट्सवरच सगळी मदार असते. २७० मतांचा कोटा कोणाच्या पारड्यात पडतो त्यावर विजय ठरतो. हा जादुई आकडा गाठण्याची किमया साधली तर जो बायडेन यांचा अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंतचा मार्ग मोकळा होऊ शकतो. बायडेन यांच्या पारड्यात २०३ इलेक्टोरल व्होट्स पडत असल्याचे सरळ दिसते. नेव्हाडा (०६) आणि कोलोरॅडो (०९) अशी ट्रम्प यांच्या पारड्यातली मते बायडेन यांच्या पारड्यात पडली तर हा आकडा जातो २१८ वर. डेमॉक्रॅटिकची पारंपरिक राज्यं जसं की मिनेसोटा (१०), मिशिगन (१६), व्हिस्किन्सन (१०) येथील मते बायडेन यांना मिळतील. यापूर्वीच्या २०१६च्या निवडणुकीत व्हिस्किन्सन आणि मिशिगनची मते ट्रम्प यांना मिळाली होती.

1. ट्रम्प यांच्यासाठीचे ट्रम्प कार्ड

ट्रम्प यांची मदार मंगळवारच्या मतदानावर असली तरी दुसऱ्या टर्मसाठी त्यांना २७० इलेक्टोरल व्होट्सचा गठ्ठा जमवता येणार नाही असेही नाही. कारण त्यांची आकडेमोड, गणिते आणि खेळी ही रिपब्लिकनच्या पारंपरिक राज्यांतील मतांवर आधारलेली आहे. ट्रम्प यांना सरळ सरळ १२५ इलेक्टोरल व्होट्स येथून मिळू शकतात. पठारी प्रदेश आणि दक्षिणेकडची राज्ये त्यांना साथ देऊ शकतील. यात टेक्सास (३८), जॉर्जिया (१६), ओहायो (१८) आणि अॅरिझोना (११). यातून ट्रम्प यांना २०८ इलेक्ट्रोरल व्होट्स मिळू शकतील.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 3, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या