नवी दिल्ली 01 मे : भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत (Corona Cases in India) होणारी वाढ पाहाता अमेरिकेनं हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जो बायडेन प्रशासन पुढील आठवड्यापासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश बंदी (US Banned Travel from India) करत आहे. व्हाईट हाऊसनं शुक्रवारी सांगितलं, की अमेरिका 4 मेपासून भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालणार आहे. इतकंच नाही तर अशा लोकांनाही अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही, जे मागील 14 दिवसांत भारतात प्रवास करून आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाचे अनेक प्रकारचे व्हेरियंट पसरत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीयांना प्रवेश बंदी करण्यात आली असून ४ मेपासून हा आदेश प्रभावी असेल, असं अमेरिकेनं म्हटलं आहे. याआधीही अमेरिकेनं आपल्या देशातील नागरिकांना भारतात न जाण्याचा आणि लवकरात लवकर देश सोडण्याचा सल्ला दिला होता. भारतातून ऑस्ट्रेलियात जाणार असाल तर खावी लागेल तुरुंगाची हवा, ‘हे’ आहे कारण या देशांनी केली आहे प्रवेश बंदी - भारतातील प्रवाशांवर बंदी घालणारा अमेरिका पहिला देश नाही. याआधीही ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रांस, यूएई, पाकिस्तान आणि सिंगापूरसह अनेक देशांनी अशाच प्रकारचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे कॅनडा, हाँगकाँग आणि न्यूझीलंडनंही भारतासोबतचे सर्व कमर्शियल प्रवास पुढे ढकलले आहेत. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी भारतात 386452 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर एकूण बाधितांची संख्या वाढून 18762976 वर पोहोचली आहे. तर, सध्या 31 लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी 3498 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 208330 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.