दिल्ली, 17 फेब्रुवारी: गेले काही दिवस रशिया (Russia) आणि युक्रेनमधील (Ukrain) युद्धसदृश्य परिस्थितीमुळे जगभरात चिंता निर्माण झाली आहे. रशियाचे सैन्य युक्रेनच्या सीमेवर घिरट्या घालत असल्यानं युक्रेननंदेखील प्रत्युत्तराची तयारी सुरू केली आहे. युक्रेनच्या या तयारीत केवळ लष्करी फौजांचा समावेश नाही, तर देशातील नागरिकांनीही (Civilinas) स्वयंस्फूर्तीनं देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावण्याची तयारी दाखवली आहे. लष्करी फौजांकडून नागरिकांना स्व-संरक्षणाचे धडे दिले जात असून, यात एका 79 वर्षीय वृद्धेनंही (79years Old Lady) हिरिरीनं सहभाग घेतला आहे. देशासाठी या वयातदेखील एके -47सारखी (AK-47) मशीनगन चालवायचं प्रशिक्षण घेणाऱ्या या आजीबाई सोशल मीडियावर चांगल्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. व्हॅलेंटिना कॉन्स्टँटिनोव्हस्का (Valentyna Konstantynovska) असं या आजीबाईंचं नाव असून, त्या पूर्व युक्रेनमधील मारियुपोल इथल्या रहिवासी आहेत. त्यांनी रविवारी युक्रेनच्या नॅशनल गार्डतर्फे देण्यात येत असलेल्या लष्करी प्रशिक्षणात भाग घेतला. यामध्ये त्यांनी एके-47 (AK-47) रायफल चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यावेळचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सर्वांत प्रथम ब्रीझीस्क्रोलवर (BreezyScroll) त्यांचा फोटो दिसला. एनबीसीच्या प्रतिनिधीनंदेखील हा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
रशियाने हल्ला केल्यास त्याचं प्रत्युत्तर देण्यास युक्रेनचं लष्कर सज्ज आहेच पण इथली जनताही तळहातावर शीर घेऊन देशासाठी लढण्यास सज्ज आहे. त्यामुळे लष्करी प्रशिक्षणात लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांचाही सहभाग दिसून येत आहे. याबाबत बोलताना व्हॅलेंटिनाने स्थानिक माध्यमांना सांगितलं की, ‘काही झाले तर मी शूट करायला तयार आहे. मी माझे घर, माझे शहर, माझ्या मुलांचे रक्षण करीन. मी त्यासाठी तयार आहे. मला माझा देश, माझे शहर गमावायचे नाही.’ ‘मी हे प्रशिक्षण घेतलं असलं तरी मी काही खूप उत्तम सैनिक होणार नाही कारण माझं शरीर आता मला तितकी साथ देत नाही. माझ्यासाठी हे शस्त्रदेखील खूप जड आहे,’ अशी खंतही तिनं व्यक्त केली. एनबीसीच्या प्रतिनिधीनं ट्विटरवर शेअर केलेल्या त्यांच्या फोटोसोबत ‘तुमची आईदेखील हेच करेल,’ हे त्यांचं वाक्यही लिहिलं आहे. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
युक्रेनियन स्पेशल फोर्स टीमचे सदस्य या प्रशिक्षणावर देखरेख करत आहेत. बंदूक कशी सज्ज करायची, त्यात गोळ्या कशा भरायच्या, दारूगोळा लोड कसा करायचा आणि नेम कसा धरायचा असं सगळं प्रशिक्षण दिलं जात आहे. या प्रशिक्षणात अनेक पालक आपल्या मुलांनाही घेऊन येत आहेत. मुलांनाही देशातील सद्यस्थिती, त्यासाठी काय करता येईल याची माहिती असली पाहिजे, ’ असं मुलाला घेऊन आलेल्या एका आईनं सांगितलं.
रशियानं युक्रेनच्या सीमेजवळ 100,000 हून अधिक सैनिक तैनात केले असून, बेलारूसला सैन्य सराव सुरू आहे. मात्र युक्रेनवर हल्ला करण्याच्या उद्देशानं या हालचाली सुरू असल्याचा आरोप रशियानं फेटाळून लावला आहे. देशासाठी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण लढायला पुढं येत असतील त्या देशावर हल्ला करणं आणि त्यावर ताबा मिळवणे कोणत्याही बलाढ्य शक्तीसाठी मोठं आव्हान आहे. युक्रेनसारख्या छोट्या देशातील या आजीबाईनी दाखवलेली हिंमत हीच त्या देशाची ताकद आहे. त्याच्याच बळावर रशियासारख्या बलाढ्य देशाचा सामना करण्यासाठी युक्रेन सज्ज झालं आहे.