Home /News /videsh /

Nancy Pelosi तैवानमध्ये उतरताच चीननं थयथयाट का केला? 23 वर्षांचा इतिहास आहे कारण

Nancy Pelosi तैवानमध्ये उतरताच चीननं थयथयाट का केला? 23 वर्षांचा इतिहास आहे कारण

नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या तैवान दौऱ्यानं वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील संघर्ष चांगलाच चिघळला आहे. चीननं केलेल्या थयथयाटामागे खास कारण आहे.

  मुंबई, 3 ऑगस्ट : चीनकडून मिळणाऱ्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) मंगळवारी (2 ऑगस्ट 2022) तैवानची राजधानी तैपेईला पोहोचल्या. नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांनी आधी तैवानच्या उपसभापती त्साई ची-चांग यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी तैवानच्या राष्ट्रपती त्साई इंग वेन यांची भेट घेतली. त्यांच्या येण्याने वॉशिंग्टन आणि बीजिंगमधील संघर्ष चांगलाच चिघळला आहे. चीननं केलेल्या थयथयाटामागे खास कारण आहे.
  चीन विरोधाचा इतिहास
  पेलोसी यांनी अमेरिकी काँग्रेसमध्ये तीन दशकांहून अधिक काळ प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्या चीनच्या उघड आणि प्रखर विरोधक राहिल्या आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे चीनला विरोध दर्शवला आहे. 1991 मध्ये, त्यांनी बीजिंगमधल्या तियानमेन स्क्वेअरमध्ये (Beijing’s Tiananmen Square) लोकशाही समर्थक आंदोलकांवर चीन सरकारने हिंसक कारवाई केल्यानंतर या लोकशाही समर्थकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ध्वज फडकवून पेलोसींनी चीन सरकारचा निषेध केला होता.
  'तैवानमधील लोकशाहीला पाठिंबा देण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेला अनुसरूनच आमचं शिष्टमंडळ तैवानच्या दौऱ्यावर आलं आहे. तैवानच्या नेत्यांशी आम्ही केलेल्या चर्चा, संवादांतून आमच्या या सहकाऱ्यासोबत असलेल्या सामायिक हितसंबंधांच्या वृद्धीसाठी आम्ही पाठिंबा देत आहोत हेच आम्हाला पुन्हा एकदा दाखवायचं आहे. त्याचबरोबर मुक्त आणि मोकळ्या भारत-प्रशांत (Indo-Pacific region) क्षेत्रातील परिस्थितीसाठीही आम्ही कटिबद्ध असल्याचं आम्ही सांगू इच्छितो,' असं ट्विट त्यांनी केलं.
  पेलोसी यांच्याबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी
  - पेलोसी या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या (House of Representatives) 52व्या स्पीकर आहेत. पेलोसींनी 2007 मध्ये अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती म्हणून काम केलं होतं. अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या पहिल्या महिला सभापती ठरत त्यांनी इतिहास घडवला होता.
  - जानेवारी 2019 मध्ये त्या पुन्हा सभापती म्हणून निवडून आल्या. स्वतःच स्थान पुन्हा मिळवत त्यांनी इतिहास रचला. मागच्या सहा दशकांत पुन्हा सभापतिपदी निवडून येणाऱ्या त्या पहिली व्यक्ती ठरल्या.
  - त्यांचे दिवंगत वडील थॉमस डी'अलेसॅंड्रो ज्युनिअर यांनी काँग्रेसमध्ये पाच वेळा शहराचं प्रतिनिधित्व केल्यानंतर 12 वर्षे बाल्टिमोरचे (Baltimore) महापौर म्हणून काम केलं. त्यांचे भाऊ Thomas D’Alesandro III यांनीही बाल्टिमोरचं महापौरपद भूषवलं होतं.
  - त्यांनी वॉशिंग्टन डी.सी. येथील ट्रिनिटी कॉलेजमधून (Trinity College in Washington, D.C.) डिग्री प्राप्त केली. नॅन्सी, त्यांचे पती पॉल पेलोसी हे मूळचे सॅन फ्रान्सिस्कोचे आहेत. त्यांना पाच मुलं आणि नऊ नातवंडे आहेत.
  - गेल्या 35 वर्षांपासून पेलोसी कॅलिफोर्नियातील (California) सॅन फ्रान्सिस्को (San Francisco) या 12 व्या जिल्ह्याचं काँग्रेसमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत.
  - उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यानंतर अमेरिकन राष्ट्रपतिपदासाठी इच्छुक असलेल्या त्या दुसर्‍या क्रमांकाच्या नेत्या आहेत. 1997 मध्ये अमेरिकी प्रतिनिधीगृहाचे सभापती असलेल्या न्यूटन गिंगरिच (Newton Gingrich) यांनी तैवानला भेट दिली होती त्यानंतर पेलोसी यांनी तैवानला भेट दिली आहे.
  - त्यांनी 19 वर्षे हाउस डेमोक्रॅट्सचं (House Democrats) नेतृत्व केलंय आणि यापूर्वी हाउस डेमोक्रॅटिक व्हिप (House Democratic Whip) म्हणूनही काम केलंय.
  - त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी दोन डेमोक्रेटिक प्रशासनांतर्गत अफोर्डेबल केअर अॅक्ट (Affordable Care Act) आणि अमेरिकन रेस्क्यू प्लॅन (American Rescue Plan) योजनेसह महत्त्वाच्या कायद्यांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. रेस्क्यू प्लॅन योजना देशात साथीच्या आजारांमध्ये खूप महत्वाची ठरली. या योजनेअंतर्गत लाखो अमेरिकन नागरिकांना थेट त्यांच्यापर्यंत पोहोचून लस देणं, गरजू कुटुंबांना थेट मदत देणं, लाखो नवीन नोकऱ्या निर्माण करणं, शिक्षक, पोलीस अधिकारी, अग्निशामक, ट्रान्झिट कामगारांना आणि इतर पहिल्या फळीतील कामगारांना मदत करणं, मुलं सुरक्षितपणे शाळेत पुन्हा जाऊ शकतील, यासाठी सोई पुरवणं ही कामं करण्यात आली. यासह त्यांनी सदनात पायाभूत सुविधा गुंतवणूक आणि नोकऱ्यांचा कायदा मंजूर करून घेतला.
  - वेबासाईटवरील माहितीनुसार, पेलोसी स्पीकर म्हणून त्यांच्या चौथ्या टर्ममध्ये सरकारी खर्च कमी करणं, पेचेक्स वाढवणं आणि अमेरिकन कुटुंबांसाठी नोकऱ्या निर्माण करणं यासाठी काम करत आहेत.
  - अमेरिकेतल्या111 व्या काँग्रेसमध्ये अमेरिकन रिकव्हरी अँड रीइन्व्हेस्टमेंट अॅक्ट (American Recovery and Reinvestment Act) पास करून देशाला आर्थिक संकटाच्या गर्तेतून बाहेर काढताना त्यांनी सभागृहाचं नेतृत्व केलं.
  - अमेरिकन महिला हक्क चळवळीचे जन्मस्थान असलेल्या सेनेका फॉल्स (Seneca Falls) येथील एका समारंभात 2013 मध्ये त्यांना ‘नॅशनल वूमेन्स हॉल ऑफ फेम’ म्हणून गौरवण्यात आले.
  - 2017 मध्ये डेमोक्रॅटिक नेत्या म्हणून पेलोसी यांनी रिपब्लिकन पक्षाच्या "ट्रम्प केअर" कायद्यापासून अमेरिकी कुटुंबांचं रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला होता.
   - पेलोसी यांनी कायमच जागतिक हवामान बदल संकटाला सभातींच्या अजेंड्यावरी प्रमुख मुद्दा म्हणून प्राधान्य दिलं आहे. 2007 मध्ये त्यांनी एक सर्वसमावेशक ऊर्जा कायदा लागू केला. त्या कायद्यामुळे तीन दशकांत पहिल्यांदाच व्हेईकल फ्युएल एफिशियन्सी स्टँडर्ड्समध्ये (vehicle fuel efficiency standards) सुधारणा करण्यात आल्या. हा कायदा अमेरिकेतील स्वदेशी जैवइंधनांसाठी गेमचेंजर ठरला.
  - 2009 मध्ये त्यांनी अमेरिकन क्लिन एनर्जी आणि सुरक्षा कायदा पास केला. 2021 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सभागृहाने हवामानबदलासंबंधी इतिहासातील सर्वात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. क्लिन एनर्जीचा वापर आणि नैसर्गिक आपत्ती रोखण्याच्या दृष्टिने अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्धा ट्रिलियन म्हणजेच 500 बिलियन इतक्या डॉलर्सची तरतूद करण्यात आली आहे.
  - पेलोसी यांनी प्रेसिडियो ट्रस्ट तयार करण्यासाठी आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या पूर्वीच्या लष्करी पोस्टचे अर्बन नॅशनल पार्कमध्ये (urban national park) रूपांतर करण्यासाठी कायदा तयार केला.
  - त्यांनी 1989 मध्ये "पेलोसी अमेंडमेंट" पास करून घेतलं होतं. ते आता विकासाच्या संभाव्य पर्यावरणीय प्रभावांचं मूल्यांकन करण्यासाठी एक जागतिक साधन आहे.
   - 2021 मध्ये तत्कालीन अध्यक्ष ट्रम्प यांनी चिथावणीखोर वक्तव्यं केल्यानंतर यूएस कॅपिटलमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावेळी बंडखोरांकडून निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, हाउसने ट्रम्प यांच्यावर दुसऱ्यांदा महाभियोग चालवला. या वेळी सभापती असलेल्या पेलोसी यांनी 6 जानेवारीच्या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी द्विपक्षीय निवड समिती तयार केली होती.
  - पेलोसी या अमेरिकेच्या इतिहासातील House Permanent Select Committeeच्या सर्वात जास्त काळ सदस्या आहेत. त्या 1993-2003 या समितीच्या सदस्या होत्या. त्यापैकी 2000-2003 या काळात त्यांनी रँकिंग सदस्या म्हणून काम केलं आणि अजूनही त्या त्या या समितीच्या सदस्या आहेत.
  - त्यांनी Don’t Ask, Don’t Tell’ या भेदभाव करणाऱ्या धोरणाला रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला. यामुळे गे (gay) आणि लेस्बियन अमेरिकन (lesbian Americans) नागरिकांना देशात स्वतःची ओळख न लपवता देशाची सेवा करण्याची परवानगी मिळाली.
  नॅन्सी पेलोसी यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. अशातच आता त्यांच्या तैवान भेटीकडे चीनसह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय.
  First published:

  Tags: China, USA, World news

  पुढील बातम्या