ऑस्ट्रेलिया, 17 सप्टेंबर : एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, की ज्यामुळे त्याच्या संपूर्ण आयुष्यालाच कलाटणी मिळते. काही जण नशीब आजमावण्यासाठी, तसंच कमी श्रमात अधिक पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यांना त्यात यश मिळतंच असं नाही. परंतु, काही जण अगदी सहज म्हणून एखादी गोष्ट करतात आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून जातं. हे सर्व सांगण्याचं कारणही तसंच आहे. ऑस्ट्रेलियातल्या (Australia News) क्वीन्सलँड (Queensland) इथल्या एका जोडप्याबाबत अशी एक घटना घडली, की ज्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. अगदी सहज केलेली कृती त्यांना मोठा आर्थिक फायदा देऊन गेली. हे जोडपं सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटनाला (Tourism) गेलं होतं. एके ठिकाणी त्यांनी लॉटरी (Lottery) खरेदी केली आणि लॉटरीचं बक्षीस त्यांनी जिंकलं. हे बक्षीस तब्बल 5 कोटींचं होतं. अनपेक्षित धनलाभ झाल्याने या जोडप्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. याबाबतचं वृत्त `आज तक`नं दिलं आहे. सर्वसामान्यपणे अनेक जण सुट्टीचा आनंद घेण्यासाठी स्वखर्चाने पर्यटनासाठी जातात. एका ऑस्ट्रेलियन जोडप्याला मात्र चक्क पर्यटनादरम्यान 5 कोटी रुपये मिळाले आहेत. या जोडप्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही. हे जोडपं केर्न्समध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होतं. त्या दरम्यान सोमवारी रात्री आणि बुधवारी त्यांनी रस्त्यावरच्या एका दुकानातून गोल्ड लोट्टोचं लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. त्यांच्या तिकिटाचा क्रमांक ड्रॉशी म्हणजेच 33-15-22-24-18-14 या क्रमांकाशी जुळला आणि या जोडप्यानं 7,33,487.36 डॉलर्स म्हणजेच 5,15,22,835 रुपयांचा जॅकपॉट (Jackpot) जिंकला, अशी माहिती लॉटरी अधिकाऱ्यांनी दिली. हे ही वाचा- बर्गरमध्ये आढलेलं माणसाचं तुटलेलं बोट, महिलेने शेअर केला भयंकर अनुभव लॉटरीविजेत्या महिलेच्या पतीनं सांगितलं, `आम्ही काल रात्री लोट अॅपवर तिकीट चेक केलं. त्यावेळी जे दिसलं त्यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. आम्हाला वाटलं, की काही तरी चूक झाली असावी. कारण असं काही आमच्यासोबत कधीच झालं नव्हतं. त्यामुळे हा जॅकपॉट आमच्यासाठी एका स्वप्नाप्रमाणे आहे. यापुढे आम्ही अधिक जबाबदारीनं कार्यरत राहू.` `अगदी प्रामाणिकपणे सांगायचं, तर या एवढ्या रकमेचं काय करायचं, याबाबत मोठा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही अर्थविषयक सल्लागाराचा सल्ला घेऊ इच्छितो. सेवानिवृत्तीनंतरच्या काळात हे पैसे आम्हाला उपयुक्त ठरतील. परंतु, या पैशांचा वापर बुद्धी वापरून करायचा, याची जाण आम्हाला निश्चितच आहे,` असं लॉटरीविजेत्या व्यक्तीच्या पत्नीनं सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.