बँकॉक, 05 जून : थोड्या वेदना झाल्या की पेनकिलर घेण्याची अनेकांना सवय असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवायच अशी अनेक औषधं घेतली जातात. मात्र असंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर घेणं थायलँडमधील (Thailand) महिलेला महागात पडलं आहे. इबुप्रोफेन (Ibuprofen) हे औषध घेतल्यानंतर तिच्या शरीराची आग झाली आहे. त्वचेवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले.
योथिका कावेखम या महिलेने 19 मे रोजी सकाळी आणि दुपारी जेवणानंतर प्रत्येकी एक इबुप्रोफेन गोळी घेतली. त्यानंतर तिच्या शरीराच्या आत जळजळ होऊ लागली. काही तासांतच तिची त्वचा पुरळ आणि फोडांनी भरली. तिला असह्य वेदना होऊ लागल्या.
तिच्या पतीने तिला रुग्णालयात नेलं. रुग्णालयात तिला तात्काळ आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. सात दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. आता तिची प्रकृती ठिक आहे.
हे वाचा - धक्कादायक! केरळमध्ये याआधी झाला आहे हत्तीणीचा फटाक्यांमुळे क्रूर मृत्यू
द सनच्या वृत्तानुसार योथिका म्हणाली, "या घटनेनंतर मी गोष्ट शिकली ती म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतंही औषध घेऊ नये. इतके दिवस उपचार आणि भयंकर वेदना सहन केल्यानंतर सल्लाशिवाय औषध घेणं किती धोकादायक ठरू शकतं, हे मला समजलं. अॅलर्जी रिअॅक्शन आता कमी झालं आहे. मात्र माझं शरीर ठिक होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आता मला पहिल्यापेक्षा कमी वेदना होत आहेत"
हे वाचा - corona : वडिलांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी डॉक्टरांनी तिला दिली होती मोजून 3 मिनिटं
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणं योथिकाच्या जीवावर बेतू शकलं असतं. या पेनकिलरमुळे तिचा मृत्यूही झाला असता मात्र सुदैवानं ती वाचली आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं.
थायलँडच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे उपसचिव डॉ. सुरचोक तांगिवत यांनी सांगतिलं, "योथिकावर इबुप्रोफेनचा झालेला परिणाम खूपच धोकादायक होता. ती नशीबवान आहे की ड्रग अॅलर्जीमुळे तिचा मृत्यू झाला नाही. पेनकिल स्टेरॉइड आणि पॅरासिटामोलच्या तुलनेत इब्रुप्रोफेनमुळे अॅलर्जीची शक्यता जास्त असते. काही गंभीर प्रकरणात या अॅलर्जीमुळे मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेणं योग्य नाही"
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - World Environment Day - लॉकडाऊनमध्ये तज्ज्ञांना सापडला प्रदूषण नियंत्रणाचा मार्ग