लंडन, 30 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर (Common man struggling for justice in Taliban rule) सर्वसामान्यांचं जगणं दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. आपल्या 13 वर्षांच्या बहिणीसोबत लग्न (Taliban fighter wants to marry 13 year old girl) करण्यासाठी तालिबानकडून दबाव आणि धमक्या येत असल्याची तक्रार एका तरुणाने केली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या या अफगाणि तरुणाने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत (Girl's brother getting threats) आपली व्यथा मांडली आहे.
तालिबानींना करायचंय लग्न
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर आता फायटर्सना लग्न करण्यासाठी मुली हव्या आहेत. त्यासाठी तालिबानी फायटर्स मिळेल त्या मुलीशी लग्न करत असून तरुणींमध्ये घबराटीचं वातावरण आहे. तुझ्या बहिणीशी आपल्याला लग्न करायचं असून लवकरच आम्ही तुझ्या बहिणीला घेऊन जाऊ, असा निरोप लंडनमध्ये राहणाऱ्या तरुणाला आला आहे. आपल्या बहिणीचं तालिबानी फायटरसोबत लग्न झालं, तर आयुष्यभर ती कैदेत अडकून पडेल, अशी भीती त्याने व्यक्त केली आहे.
कुटुंब अफगाणिस्तानात
ब्रिटीश सरकारक़डून दिल्या जाणाऱ्या ‘शेवनिंग स्कॉलरशिप’अंतर्गत हा तरुण ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनचं सरकार जगभरातील हुशार आणि होतकरू मुलांच्या शिक्षणासाठी स्पॉन्सरशिप देतं आणि त्यांना उत्तमोत्तम शिक्षण देतं. या कार्यक्रमासाठी तरुणाची निवड झाल्यामुळे तो अफगाणिस्तानमधून ब्रिटनमध्ये आला होता. मात्र आपल्या कुटुंबाला तो सोबत आणू शकला नव्हता. तालिबानचं राज्य आल्यामुळे आता सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झाल्याची प्रतिक्रिया त्याने माध्यमांना दिली आहे.
हे वाचा - UK Fuel Crisis: गॅस स्टेशनबाहेर रांगा, बाटलीभर पेट्रोलसाठी इंग्रजांत हाणामारी
तालिबानकडून धमकी
तालिबानकडून आपल्याला सतत फोन येत असून आपण ब्रिटीश एजंट असल्याचा आरोप ते करत असल्याचं तरुणानं सांगितलं आहे. तू ब्रिटनमध्ये असल्यामुळे आम्ही काही करू शकत नसलो, तरी इथे असणाऱ्या तुझ्या कुटुंबाला पाहून घेऊ, अशी धमकी तालिबानी फायटर्स देत असल्याची व्यथा त्याने मांडली आहे. तालिबानच्या विरोधात काहीही बोललं तरी इस्लामविरोधी असल्याचा ठपका ठेवला जात असल्याचं तो म्हणाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban, Women