मुंबंई, 25 जून: गेल्या काही वर्षांत भारतात महिला पुरोहित दिसण्याचं प्रमाण वाढलं असलं, तरी ही संकल्पना अजून मोठ्या प्रमाणावर रुजलेली नाही. तसंच, समलिंगी विवाह ही संकल्पना भारतात सामाजिकदृष्ट्या स्वीकारली गेलेली नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत एक हिंदू महिला पुरोहित चक्क LGBTQ समाजातील समलिंगी विवाहसोहळ्यांचं पौरोहित्य करते आहे. सुषमा द्विवेदी असं या महिला पुरोहिताचं नाव असून, ती 40 वर्षांची आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या हवाल्याने ‘ दी इंडियन एक्स्प्रेस ’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अमेरिकेत (USA) मुळात महिला पुरोहितांची संख्या 10पेक्षा कमी आहे. त्यात तृतीयपंथीय (Transgender) आणि समलिंगी विवाहांच्या (Same Sex Marriage) पौरोहित्याचं काम कोणीही करत नाही. म्हणून सुषमा द्विवेदींनी 2016मध्ये न्यूयॉर्कमध्ये पर्पल पंडित प्रोजेक्टची (Purple Pundit Project) स्थापना केली. त्याअंतर्गत पुरोगामी, सर्वसमावेशक आणि LGBTQ फ्रेंडली धार्मिक सेवा पुरवल्या जातात. लैंगिकदृष्ट्या सर्वसामान्य असलेल्या व्यक्तींबरोबरच, समलिंगी विवाह, आंतरवर्णीय विवाह, बालकांचे नामकरण विधी, गृहप्रवेश, उद्योगाची सुरुवात आदी प्रसंगांचे विधी आदींचं पौरोहित्य सुषमा द्विवेदी (Sushma Dwivedi) करतात. आतापर्यंत त्यांनी 33 विवाहसोहळ्यांचं पौरोहित्य केलं असून, त्यापैकी किमान निम्मे सोहळे हे समलिंगी दाम्पत्यांचे होते. हे वाचा- या देशात आढळल्या 751 कबरी, चिमुकल्यांना मारुन शाळेच्या मैदानात पुरल्याची भीती 2013मध्ये सुषमा यांचा विवाह पारंपरिक भारतीय पद्धतीने पार पडला. त्यांचा दीर समलिंगी असल्याने ‘त्याचा विवाह करायच्या वेळी अशा पद्धतीने तो होणार नाही, कारण सांस्कृतिकदृष्ट्या ते स्वीकारलं गेलेलं नाही,’ ही गोष्ट त्यांना वेदनादायी वाटली. लग्नानंतर दोन महिन्यांतच त्यांना युनिव्हर्सल लाइफ चर्चकडून धर्मोपदेशक म्हणून नियुक्ती मिळाली. त्यांना काही तरी वेगळं करायचं होतं; मात्र काय ते सुचत नव्हतं. त्यातच 2016मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळी एक घटना घडली. त्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांच्याच मजल्यावरच्या एका दाम्पत्याला तातडीने विवाह करायचा होता. कारण त्या दाम्पत्याचं मूल जन्माला येणार होतं आणि त्याचा जन्म होण्याआधी त्यांना विवाहविधी पार पाडायचा होता. तेव्हा आपण धर्मोपदेशक असल्याचं सुषमा यांनी सांगितलं. त्यांना सुरुवातीला पटलं नाही; पण त्यांच्याकडे काहीच पर्याय नसल्याने त्यांनी सुषमा यांना विवाहविधी पार पाडण्यास सांगितलं आणि तो हॉस्पिटलमध्येच तो विधी पार पडला. त्याचे व्हिडीओ व्हायरलही झाले. त्याच वर्षी LGBTQ समुदायाचे हक्क हिरावून घेतले गेले होते. ‘माझ्यातल्या मातृत्वाने माझी अंतरीची कार्यकर्तेपणाची ज्योत पेटवली होती. त्यातूनच मी वेगळं काही तरी करू शकते, ही भावना दृढ झाली,’ असं त्यांनी सांगितलं. त्यातूनच त्यांनी स्वतःचा प्रकल्प सुरू केला आणि वेबसाइट सुरू केली. साउथ एशियन गे कम्युनिटीसाठी काम करायचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं. वाईट अनुभवही आले, मात्र त्यांनी संयमाने आपलं काम सुरू ठेवलं. हे वाचा- एका रात्रीसाठी केलं होतं हायर, टेक टायकूनने कॉल गर्लसोबत थाटला होता संसार सुषमा ज्या विवाहसोहळ्याचं पौरोहित्य करतात, त्याचा विधी त्यांनी कस्टमाइज (Customize) केला आहे. तो विधी 35 मिनिटांत पार पडतो. सुरुवातीला श्री गणेशाला वंदन करून नवदाम्पत्याच्या वाटेतले अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना केली जाते. मग परस्परांबद्दलचं उत्तरदायित्व, निष्ठा, विश्वास व्यक्त करण्यासाठी अग्नीभोवती फेरे घेतले जातात. त्याशिवाय पंचतंत्रातल्या एका उताऱ्याचं वाचन केलं जातं. त्यातून दाम्पत्य परस्परसमानतेची आणि सहयोगाची शपथ घेतं. हा विधी पारंपरिक हिंदू विधीत समाविष्ट नाही. सुषमा यांच्या मते, पारंपरिक हिंदू विधी पितृसत्ताक असून, महिला ही मालमत्ता म्हणून दिली जाते. हे विधी करताना सुषमा लेहेंगा किंवा सलवार कमीझ अशा वेशात असतात. त्या वेळी पायात चप्पल घालत नाहीत. तसंच, आजीने दिलेली सोन्याची अंगठी आणि सोन्याचे दागिनेही घालतात, असं त्यांनी सांगितलं. ‘जेव्हा एखादं दाम्पत्य येऊन सांगतं, की ‘आमचा विवाह हे स्वप्न होतं आणि ते सत्यात उतरू शकत नाही, असं आम्हाला वाटत होतं; पण ते तुमच्यामुळे शक्य झालं, तेव्हा मला खूप चांगलं वाटतं,’ असं सुषमा सांगतात. 40 वर्षांच्या द्विवेदी यांचे पती 37 वर्षांचे असून, त्यांचं नाव विवेक जिंदाल (Vivek Jindal) असं आहे. कॅनडात वाढलेल्या सुषमा द्विवेदी सध्या हार्लेममध्ये राहतात. डेली हार्वेस्ट नावाच्या एका ऑरगॅनिक फूड कंपनीत त्या उपाध्यक्षा आहेत. या दाम्पत्याला पाच वर्षांचा आश्विन आणि तीन वर्षांचा नयन अशी दोन मुलंही आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.