Home /News /videsh /

अमेरिकेत कोरोनामुळे जाऊ शकतात 2 लाख जीव; दोन आठवड्यात आकडा वाढण्याचं कारण आलं समोर

अमेरिकेत कोरोनामुळे जाऊ शकतात 2 लाख जीव; दोन आठवड्यात आकडा वाढण्याचं कारण आलं समोर

जगातल्या सर्वांत समर्थ आणि श्रीमंत देशात पैसा, तंत्रज्ञान आणि संसाधनं असूनही कोरोनामृत्यूची संख्या भयावह ठरू शकते, असा अंदाज आहे. न्यूयॉर्क टाइम्सने त्यामागचं धक्कादायक कारण सांगणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

    न्यूयॉर्क, 30 मार्च : सुरुवातीला चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाव्हायरसनं युरोपकडे मोर्चा वळवला. इटली आणि पाठोपाठ स्पेन या महासाथीचं केंद्रबिंदू बनत आहेत, असं वाटत असतानाचा महसत्ता अमेरिकेतही कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली. रविवारी धक्कादायक आकडा पुढे आला. न्यूयॉर्कमध्ये फक्त एका शहरात 24 तासांत Coronavirus मुळे  237 मृत्यू झाले. कोरोनाग्रस्तांची संख्या फक्त एका दिवसात 7195 ने वाढली. अमेरिकेतल्या तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे या दराने अमेरिकेत 2 लाख मृत्यू होऊ शकतात. अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याची घोषणा करताना सांगितलं की, कोरोनामृत्यूंची संख्या 1 लाखाच्या वर जाऊ नये. सरकारचे प्रयत्न त्या दृष्टीने सुरू आहेत. पण मुळात जागतिक महासत्ता असलेल्या प्रगत राष्ट्राची एवढी हतबल अवस्था का व्हावी? न्यूयॉर्क टाईम्सने अमेरिकेत वाढलेल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमागचं धक्कादायक कारण उलगडून सांगणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यासाठी या वृत्तपत्राने अमेरिकेच्या आरोग्य आणि विज्ञान क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांशी, सरकारशी संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीत केली. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने कोरोनाच्या साथीचा अंदाज येऊनसुद्धा एक महिना फुकट घालवला. या महिन्यात पुरेशा प्रमाणात टेस्ट झाल्या असत्या आणि सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाइनचे नियम पाळले गेले असते तर कोरोनाग्रस्तांची संख्या एवढी वाढलीच नसती. वाचा Fact check - भरपूर पाणी प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा नाश होतो? कोरोनाव्हायरसच्या टेस्टवर निर्बंध होते. सर्व संशयितांची चाचणी करण्यात आली नाही, याचं कारण अमेरिकेतला लालफितीचा कारभार असल्याचं धक्कादायक वास्तव न्यूयॉर्क टाईम्सने अधोरेखित केलं आहे. अमेरिकेतली सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन CDC ही अमेरिकेतली राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा आहे. त्यांनी सुरुवातीला कुणाची टेस्ट करायची आणि कुणाची नाही, याविषयीचे निर्बंध घातलेले होते. त्यामुळे लोकांच्या नकळतच हा विषाणू फैलावत गेला. कम्युनिटी स्प्रेड रोखण्याच्या उद्देशाने अधिकाधिक लोकांची Covid-19 ची चाचणी करा असं जागतिक आरोग्य संघटनेनंसुद्धा WHO म्हटलं आहे. पण अमेरिकेसारख्या श्रीमंत आणि सामर्थ्यवान देशानेही याकडे दुर्लक्ष केलं. कोरोना पॉझिटिव्ह लक्षात आले तर त्यांचं विलगीकरण करून समाजात हा विषाणू अधिक खोलवर पसरण्यापासून रोखता येतं. ते झालं नाही आणि म्हणूनच आता टेस्ट वाढल्यानंतर अमेरिकेत कोरोनाव्हारसचं भयावह चित्र निर्माण झालं आहे. अमेरिकेने स्वतः निर्माण केलेली टेस्ट किट उपलब्ध व्हायला उशीर झाला. त्यामागे सरकारी लालफितीचा कारभार कारणीभूत असल्याचं न्यूयॉर्क टाईम्सच्या या लेखात म्हटलं आहे. अमेरिकेत या साथीने आतापर्यंत 2510 लोकांचा  बळी घेतला आहे. दुसरीकडे जगभरात आतापर्यंत 7 लाख 10,000 लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. आणि 33,000 हून अधिक मृत्यू झाले आहेत. यातले 10 हजारांहून अधिक मृत्यू एकट्या इटलीत झाले आहेत. ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत भारतात कोरोनाव्हायरसमुळे 29 जणांचा मृत्यू झाला आहे आणि हजारहून जास्त जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 'कोरोना'विरोधात चीनने बनवलं हत्यार, शरीरात घुसून करणार व्हायरसचा नाश
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या