कैरो, 30 मार्च : निसर्गावर विजय मिळवण्याचा माणसाने कितीही प्रयत्न केला तरीही माणूस हा निसर्गासमोर खूप लहान आहे हे तो वारंवार दाखवून देतो. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरीही नैसर्गिक शक्तींपलीकडे जाण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे नाही याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. त्सुनामी, भूकंप, गेल्या वर्षीपासून आलेली कोरोना महासाथ ही अगदी मोजकी उदाहरणं सर्वांना माहीत आहेत. असाच एक ताजा अनुभव सोमवारी आला. युरोप आणि आशियातील 10 टक्के सागरी व्यापार ज्या इजिप्तमधल्या सुएझ कालव्यामार्गे (Suez Canal) चालतो त्या कालव्यात एव्हर गिव्हन (Ever Given) हे विशाल जहाज अडकलं (Suez Canal Blockage) आणि ही जलवाहतून ठप्प झाली. ही घटना एक आंतरराष्ट्रीय आपत्तीसारखीच होती कारण अनेक देशांची मालवाहू जहाजं अडकलेल्या जहाजाच्या दोन्ही बाजूंना अडकून पडली. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा झाला.
गेल्या मंगळवारी 400 मीटर लांब आणि 59 मीटर रुंद असं विशाल जहाज सुएझ कालव्यात अडकलं. एका मोठ्या दगडात हे जहाज अडकलं आहे आणि 950000 क्युबिक वाळूने त्या जहाजाला पाण्यात 60 फूट खाली नेलं होतं असं म्हटलं जात होतं. ते मार्गस्थ करण्यासाठी अनेक टग बोट्स आणि क्रेन मागवण्यात आल्या. दोन्ही किनाऱ्यांना जहाज अडकल्यामुळे दोन्ही किनारे क्रेनने विस्तारित करून जहाज काढण्याचा प्रयत्न झाला. पण तो फळाला आला नाही.
हे वाचा - चीनचा हाँगकाँग निवडणुकीत हस्तक्षेप; नव्या कायद्याने हाँगकाँगवासियांची मुस्कटदाबी
इंजिनिअर्सनी टगबोट आणि क्रेनच्या सहाय्याने जहाज बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अपयशी ठरले. तेव्हा सर्व तज्ज्ञांनी पौर्णिमेची वाट पाहण्याचं ठरवलं. माणसाचे प्रयत्न थकल्यानंतर नैसर्गिक शक्तीसमोर नमणं गरजेचंच होतं. या इंजिनियर्स आणि कामगारांच्या प्रयत्नांना बळ मिळालं ते पौर्णिमेच्या चंद्राचं असंच म्हणायला हवं.
सूपरमूनमुळे कसं निघालं अडकलेलं जहाज?
चंद्र पृथ्वीभोवती फिरताना एक क्षण असा येतो की तो पृथ्वीच्या सर्वांत जवळ येतो. तेव्हाच तो खूप चमकताना पृथ्वीवरून दिसतो. त्या घटनेलाच सूपरमून म्हणतात. त्यावेळी गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती येते. त्यामुळे पाण्याची पातळी एक ते दीड फुटांनी वाढते. त्याला स्प्रिंग टाइड म्हणतात. महिन्यात दोन वेळा ही नैसर्गिक घटना घडते. सुएझ कालव्यातील जहाज बाहेर काढण्यासाठी थांबलेल्या इंजिनिअर्सच्या प्रयत्नांना समुद्राला येणाऱ्या भरतीची मदत झाली आणि ते जहाज वर उचललं गेलं आणि ते बाहेर खेचून काढणं माणसाला शक्य झालं.
जहाज अडकलं कसं?
एमव्ही एव्हर गिव्हन हे जगातलं सगळ्यात मोठं मालवाहू जहाज आहे. त्यावरून क्रूड ऑइल, जनावरांचा आहार असं वेगवेगळ्या प्रकारचं सामान नेलं जात होतं. जेव्हा हे जहाज सुएझ कालव्यातून जात होतं तेव्हा कालव्याच्या काठावर जोरदार वारं आलं आणि वाळूचे लोट निर्माण झाले. जलमार्ग अगदी लहान असल्यामुळे आणि जोरात वारं आल्यामुळे जहाजावरील क्रूचं जहाजावरचं नियंत्रण सुटलं आणि ते वाळू असलेल्या काठावर जाऊन रुतलं. त्यामुळे संपूर्ण कालवाच अडवला गेला आणि सुमारे 367 जहाजं अडकून पडली होती.
हे वाचा - बंदीला चॅलेंज! डोनाल्ड ट्रम्प सुरू करणार स्वत:ची सोशल मीडिया साईट
सोमवारी संध्याकाळी जहाज मार्गस्थ झालं आणि जलवाहतूक सुरळीत झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Moon, World news