सोल,12 नोव्हेंबर: उत्तर कोरियाची (
North Korea) जगातल्या सर्वांत रहस्यमय देशांमध्ये गणना केली जाते. तिथल्या सरकारनं मीडिया (
Media) आणि इंटरनेटवर (Internet) कडक निर्बंध घातल्यामुळे त्या देशात काय चाललं आहे, तिथली परिस्थिती काय आहे, याची माहिती सरकारच्या इच्छेशिवाय बाहेर जाऊ शकत नाही. उत्तर कोरियातल्या नागरिकांना अनेक कठोर नियमांना बांधील राहावं लागतं. एखादी व्यक्ती सरकारी नियमांच्या विरोधात गेली, तर तिला थेट मृत्युदंड दिला जातो. अशातच, उत्तर कोरियातल्या तुरुंगांची भीतिदायक स्थिती दर्शवणारे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. उत्तर कोरियातल्या फोर्स्ड लेबर कॅम्पचे (
Forced Labor Camp) हे फोटो सॅटेलाइटच्या (Satellite Images) माध्यमातून घेण्यात आले आहेत. यापूर्वी या कॅम्पमधून पळून आलेल्या एका कैद्यानंही आतली भयानक परिस्थिती लोकांच्या समोर मांडली होती.
काही दिवसांपूर्वी सॅटेलाइट कॅमेऱ्यांच्या मदतीने उत्तर कोरियातल्या लेबर कॅम्पचे फोटो मिळवण्यात आले होते. त्यातले अनेक फोटो चीनच्या सीमेलगत असलेल्या तोसोंग-नी (T’osŏng-ni) लेबर कॅम्पचे आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या कैद्यांना कित्येक तास शेतामध्ये राबवलं जातं. काही दिवसांपूर्वी याच कॅम्पमधून पळून आलेल्या किम डूह्यून (Kim Doohyun ) या कैद्यानं देशात अन्नधान्याचा तुटवडा असल्याचा खुलासा केला होता. अशा परिस्थितीत कैद्यांना उपाशी ठेवून त्यांच्याकडून शेतात काम करून घेतलं जातं. आतापर्यंत तिथल्या अनेक कैद्यांचा उपासमारीनं मृत्यू झाला आहे, असंदेखील किमनं उघड केलं होतं.

कॅम्पमधल्या कैद्यांना राखाडी रंगाचा गणवेश आणि टोप्या घालण्यासाठी दिल्या जातात, जेणेकरून ते लवकर कॅमेऱ्याच्या नजरेत येणार नाहीत. तिथल्या कैद्यांच्या कामाची निश्चित वेळ नाही. पहाटे 4 वाजता कामाला सुरुवात केल्यानंतर त्यांच्याकडून पाहिजे तेवढा वेळ काम करून घेतलं जातं. एकही दिवस सुट्टी न देता आठवड्याचे सातही दिवस कैद्यांकडून श्रम करून घेतले जातात. ज्या कैद्यांचे कुटुंबीय घरून जेवण पाठवतात, त्यांनाच जेवण मिळतं. ज्या कैद्यांच्या कुटुंबीयांना जेवण पाठवणं शक्य नाही, अशांना उपाशीपोटीच काम करावं लागतं.
अनेक कैद्यांच्या घरून आलेलं जेवण तर तुरुंगातले अधिकारीच खातात. कॅम्पमध्ये काम करताना अनेक कैद्यांचा मृत्यू होतो. अशा कैद्यांना शेतातच पुरलं जातं. जेणेकरून त्यांचं शरीर कुजून खत तयार होईल. चीन सीमेलगत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये सध्या सुमारे 2500 कैदी राहत असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती पळून आलेला कैदी किम याने दिली आहे.
समोर आलेले लेबर कॅम्पचे फोटो पाहता आणि किम नावाच्या कैद्यानं दिलेली माहिती लक्षात घेता, उत्तर कोरियामध्ये कैद्यांचे किती अमानुष हाल होत आहेत, हे लक्षात येतं. त्यामुळे तिथला हुकूमशहा किम जोंग उनचा (Kim Jong-un) क्रूर चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.