• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • अफगाणिस्तानातली स्थिती चिंता वाढवणारी; भारतीय पत्रकारांसाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना जारी

अफगाणिस्तानातली स्थिती चिंता वाढवणारी; भारतीय पत्रकारांसाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना जारी

भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची कट्टरपंथीय तालिबानी संघटनांनी काही दिवसांपूर्वीच हत्या केली.

 • Share this:
  काबुल, 24 जुलै : अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी (Indian Residents) भारतीय दूतावासाकडून (Indian Embassy) देण्यात आलेल्या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना (Security Advisory) आणखी काही कालावधीसाठी लागू करण्यात आल्या आहेत. या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना पहिल्यांदा 29 जून 2021 रोजी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याच सूचना अजूनही काही कालावधीसाठी लागू राहतील, असं दूतावासाने म्हटलं आहे. मनीकंट्रोल डॉट कॉमने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अफगाणिस्तानात येणाऱ्या, राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या भारतीयांनी स्वतःच्या सुरक्षेसंदर्भात आणखी काळजी घेणं अत्यावश्यक आहे. तसंच, देशाच्या विविध भागांत वाढत असलेल्या हिंसाचाराच्या घटना पाहता अनावश्यक प्रवास टाळायला हवेत, असं दूतावासाने या सुरक्षाविषयक सूचनांमध्ये म्हटलं आहे. अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये सुरक्षेची स्थिती खूपच धोकादायक बनलेली असून, दहशतवादी संघटनांनी नागरिकांना लक्ष्य केलं आहे, हल्लेही केले आहेत. भारतीय नागरिकांनाही अपहरणासारख्या गंभीर स्थितीला तोंड द्यावं लागण्याच्या घटना घडत असल्याकडे दूतावासाने आपल्या सूचनांमध्ये लक्ष वेधलं आहे. पुलित्झर पुरस्कारविजेते भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी (Danish Siddique) यांची अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये तालिबानी संघटनांनी हत्या केली. या दुर्दैवी घटनेचा उल्लेखही दूतावासाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आला आहे. 'ग्राउंड रिपोर्ट (Ground Report) कव्हर करण्यासाठी अफगाणिस्तानात येणाऱ्या भारतीय माध्यमांतल्या पत्रकारांचं (Indian Journalists) याकडे विशेषत्वाने लक्ष वेधलं जात आहे,' असंही सूचनांमध्ये म्हटलं आहे. हे ही वाचा-तालिबान्यांनी 100 निष्पाप अफगाणांना केले ठार, झेंडे फडकावून साजरा केला उत्सव 'अशा प्रकारे कव्हरेज (Coverage) करण्यासाठी अफगाणिस्तानात आलेल्या सर्व भारतीय पत्रकारांनी इथल्या भारतीय दूतावासाशी व्यक्तिगतरीत्या संपर्क साधावा आणि ते कुठे जाणार आहेत, याबद्दल माहिती द्यावी, जेणेकरून त्या विशिष्ट स्थळाच्या अनुषंगाने सुरक्षाविषयक सूचना त्यांना देता येऊ शकतील,' असं आवाहनही दूतावासाने केलं आहे. 'असं केल्यास पत्रकारांना यात असलेल्या धोक्यांचं अधिक चांगल्या प्रकारे आकलन होईल आणि दुर्दैवाने काही विचित्र परिस्थिती ओढवलीच, तर पत्रकारांना तातडीने साह्य करणंही दूतावासाला शक्य होऊ शकेल,' असं दूतावासाने सांगितलं आहे. भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांची कट्टरपंथीय तालिबानी संघटनांनी काही दिवसांपूर्वीच हत्या केली. ते रॉयटर्स (reuters) या न्यूज एजन्सीसाठी काम करत होते. Photojournalist म्हणून काम करत असताना अस्वस्थ अफगाणिस्तानातली हिंसा, तालिबानी अतिरेक्यांचा कहर त्यांनी अनेक वेळा कॅमेऱ्यात टिपला होता. तालिबानी अतिरेकी आणि अफगाणिस्तानचं लष्कर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकींचं ते वार्तांकन करत होते. south asian पत्रकार म्हणूनच तालिबान्यांनी त्यांना मारल्याचं सांगण्यात येत आहे.
  First published: