नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : इस्रायलमधल्या (Israel) एका स्कूबा डायव्हरला भूमध्य समुद्रात सुमारे 900 वर्षांपूर्वीची तलवार सापडली आहे. इस्रायलच्या अँटिक्विटीज ऑथोरिटीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर इस्रायलमध्ये वीकेंडला डायव्हिंग (Scuba Diving) करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला पुरातन वस्तूंचा खजिनाच दिसला. किनाऱ्यापासून 150 मीटर अंतरावर समुद्रात पाच मीटर खोलीवर ही व्यक्ती डायव्हिंग करत होती. त्या वेळी त्या व्यक्तीला हा खजिना सापडला. त्यात जहाजांचे नांगर (Anchors), मातीची वेगवेगळी भांडी आणि साधारण मीटरभर लांबीची तलवार आदी वस्तूंचा समावेश होता.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या प्रदेशात पुरातन काळी जहाजं उभी असायची, तसंच त्या भागात पुरातन काळातल्या अनेक वस्तूंचा खजिना आहे. त्यापैकी काही वस्तू तर 4000 वर्षांपूर्वीच्या असाव्यात, असाही अंदाज आहे. समुद्रतळाची वाळू सातत्याने हलत-फिरत असते. त्यामुळे असा हाती आलेला खजिना वाळूसारखाच केव्हा निसटून जाईल, याची शाश्वती नसते. त्यामुळे त्या डायव्हरने त्याला सापडलेली ही तलवार (Antique Sword) समुद्रातून काढून किनाऱ्यावर आणली आणि सरकारी तज्ज्ञांच्या सुपूर्द केली. ही तलवार सुमारे 900 वर्षांपूर्वीची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ती तलवार सुस्थितीत आहे.
अँटिक्विटी ऑथोरिटी (Antiquity Authority) अर्थात पुराणवस्तू प्राधिकरणातल्या दरोडाप्रतिबंधक युनिटमधले निरीक्षक नीर डिस्टेलफेल्ड यांनी सांगितलं, की या तलवारीवर सूक्ष्मजीवांनी घर केल्याचं दिसून आलं. ही तलवार लोखंडाची असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. सैनिक, शस्त्रसाठा, तलवारी अशा त्या 900 वर्षांपूर्वीच्या वेगळ्याच काळात घेऊन जाणाऱ्या या तलवारीबद्दल संशोधन करणं हा खूप औत्सुक्याचा विषय ठरणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. ही तलवार आता स्वच्छ करून, तिच्यावर संशोधन केलं जाणार आहे.
पुरातन मौल्यवान वस्तू सरकारकडे सुपूर्द करून चांगल्या नागरिकत्वाचं दर्शन घडवल्याबद्दल त्या डायव्हरला कौतुक करणारं सर्टिफिकेट देण्यात आलं. श्लोमी कॅटझिन असं त्याचं नाव आहे.
11, 12 आणि 13व्या शतकात ख्रिश्चनांनी मुस्लिमांकडून आपली पवित्र भूमी परत मिळवण्यासाठी धर्मयुद्धं केल्याचं सांगितलं जातं. त्या धर्मयुद्धातल्या योद्ध्यांना क्रुसेडर (Crusader) असं म्हटलं जातं. इस्रायलमध्ये आत्ता सापडलेली तलवार कोणा क्रुसेडरची असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
वाचा : OMG! तयार झालीय जगातील सगळ्यात छोटी बंदूक, किंमत मात्र आहे मोठी
भारताच्या 157 पुरातन वस्तू परत मिळाल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच अमेरिकेला भेट दिली. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या 76व्या सभेत भाषण करण्यासाठी ते गेले होते. भारतातून चोरीला गेलेल्या 157 पुरातन वस्तू अमेरिकी सरकारने त्यावेळी मोदींच्या हवाली केल्या. या मौल्यवान पुरातन वस्तू भारताला परत केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे आभार मानले. सांस्कृतिक ठेव्याचा अवैध व्यापार, तस्करी आणि चोरी आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी अधिक चांगल्या रीतीने प्रयत्न केले जातील, याची ग्वाही पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्तरीत्या दिली.
भारताला परत मिळालेल्या 157 पुरातन वस्तूंमध्ये 12व्या शतकातली नटराजाची 8.5 सेंटीमीटर उंच मूर्ती, 10व्या शतकातलं वालुकाश्मातलं दीड मीटरचं रेवांता बास रिलीफ पॅनेल आदींचा समावेश आहे. त्यातल्या बहुतांश वस्तू 11वं ते 14वं शतक या कालावधीतल्या आहेत. तसंच, दुसऱ्या शतकातलं टेराकोटाचं भांडं आणि ख्रिस्तपूर्व 2000 वर्षांपूर्वीच्या तांब्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. 45 वस्तू ख्रिस्तपूर्व काळातल्या आहेत. 71 वस्तू सांस्कृतिक असून, 60 मूर्ती हिंदू धर्माशी, 16 मूर्ती बौद्ध धर्माशी आणि 9 मूर्ती जैन धर्माशी निगडित आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Israel, Scuba divers