वॉशिंग्टन, 11 फेब्रुवारी : गेल्या वर्षी 24 फेब्रुवारीपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेन युद्ध थांबवण्याची अजूनही संधी आहे, असं अमेरिकेतील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अमेरिकेच्या नजरा आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खिळल्या आहेत. पंतप्रधान मोदी युक्रेन आणि रशियामधील वैमनस्य संपवू शकतात, असा अमेरिकेला विश्वास आहे. अमेरिकेच्या मते, युद्ध थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मनधरणी करू शकतात.
व्हाईट हाउसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांना विचारण्यात आलं की, पंतप्रधान मोदींनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध थांबवण्यात मध्यस्थी करण्यात किंवा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची मनधरणी करण्यात उशीर झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना जॉन किर्बी म्हणाले, "पीएम मोदींनी प्रयत्न करावेत या मताचा मी आहे. पीएम मोदी पुतीन यांना युद्ध थांबवण्यासाठी समजावू शकतात. युक्रेन आणि रशिया यांच्यातील शत्रुत्व संपवण्यासाठी होणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांचं अमेरिका स्वागत करेल. मला वाटतं की पुतीन यांच्याकडे अजूनही वेळ आहे त्यांनी युद्ध थांबवलं पाहिजे."
व्हाईट हाउसचे प्रवक्ते म्हणाले, "आम्हाला वाटतं की युद्ध आजही संपू शकतं. तसं झालंच पाहिजे." भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतल्याच्या एका दिवसानंतर अमेरिकेनं केलेलं हे विधान महत्त्वाचं आहे. जॉन किर्बी पुढे म्हणाले, "युक्रेनियन लोकांसोबत जे घडत आहे त्याला व्लादिमीर पुतीन जबाबदार आहेत. हे युद्ध आत्ता थांबवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पण, त्याऐवजी ते युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्यास प्रोत्साहन देत आहेत."
वाचा - शिवाजी महाराजांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला, पुण्याशी आहे जवळचा संबंध
गेल्या वर्षी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेच्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतीन यांना म्हणाले होते, "सध्याचं युग युद्धाचं नाही आणि मी फोनवर याबद्दल तुमच्याशी बोललो आहे. शांततेच्या मार्गाने आपण प्रगती कशी करू शकतो यावर बोलण्याची संधी मिळाली आहे." या बैठकीनंतर जागतिक स्तरावर पीएम मोदींचं कौतुक करण्यात आलं होतं.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध सुरू होऊन जवळपास वर्ष झालं आहे. या युद्धात आत्तापर्यंत लाखो युक्रेनियन नागरिकांचे हाल झाले आहेत. हजारो मृत्यू झाले आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देशांनी रशियाचा याबद्दल निषेध केला आहे. तरी देखील रशिया माघार घेण्यास तयार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Modi, Russia Ukraine