काठमांडू 15 जानेवारी : नेपाळ मधून एक अतिशय मोठी दुर्घटना समोर आली आहे. यात यति एअरलाइन्सचं ATR-72 विमान पोखराजवळ अपघातग्रस्त झालं आहे. काठमांडूहून पोखराला उड्डाण करणारं यति एअरलाइन्सचं एटीआर ७२ विमान रविवारी सकाळी कास्की जिल्ह्यातील पोखरा येथे कोसळलं. विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी मीडियाला सांगितलं की, जुनं विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आलं आहे.
पोखरा येथील अपघातस्थळावरून एकूण 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्य जिल्हा अधिकारी यांनी स्थानिक मीडियाला दिली. प्राथमिक वृत्तानुसार, विमानाने काठमांडूहून पोखरा येथे ६८ प्रवाशांसह उड्डाण केले होते. विमान सुमारे 20 मिनिटांनंतर क्रॅश झाले, जे त्याच्या गंतव्यस्थानापासून काही किलोमीटर दूर होते. बचावकार्य अद्याप सुरू आहे.
#WATCH | A passenger aircraft crashed at Pokhara International Airport in Nepal today. 68 passengers and four crew members were onboard at the time of crash. Details awaited. pic.twitter.com/DBDbTtTxNc
— ANI (@ANI) January 15, 2023
अपघातग्रस्त विमानाला आग लागली असून बचाव कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले. सर्व बचाव यंत्रणा आग विझवणे आणि प्रवाशांना वाचवणे यावर भर देत आहेत. नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरण (CAAN) नुसार, यति एअरलाइन्सच्या 9N-ANC ATR-72 विमानाने सकाळी 10:33 वाजता काठमांडू येथून उड्डाण केले. पोखरा विमानतळावर उतरत असताना जुने विमानतळ आणि नवीन विमानतळादरम्यान सेती नदीच्या काठावर विमान कोसळले.