इस्लामाबाद, 16 मार्च : - पाकिस्तानातील (Pakistan Bomb blast) बलुचिस्तानमधील (Balochistan) सिबी जिल्हा मंगळवारी पुन्हा एकदा आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यानं (suicidal bomb attack) हादरला. या स्फोटात चार जवान शहीद झाले असून 10 जण गंभीर जखमी झालेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा हल्ला इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) या संघटनेनं घडवून आणला. अब्दुल रहमान अल बकिस्तानी असं हल्लेखोराचं नाव आहे. या महिन्यात पेशावरमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात नमाज पढणाऱ्या 56 लोकांचा मृत्यू झाला होता.
'हा हल्ला करण्यासाठी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस (आयईडी - IED - Improvised Explosive Device) वापरण्यात आला. सर्व जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 6 जणांची प्रकृती चिंताजनक आहे,' अशी माहिती सिबीच्या सहाय्यक आयुक्त सना महजबीन यांनी माध्यमांना दिली.
आठवडाभरापूर्वीही सिबीमध्ये स्फोट झाला होता
आठवडाभरापूर्वीही बलुचिस्तानच्या सिबी जिल्ह्याला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. त्यानंतर वार्षिक मेळाव्यादरम्यान झालेल्या स्फोटात 5 जवान शहीद झाले, तर 28 जण जखमी झाले. या महिन्यात पेशावरमध्ये शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात नमाज पढणाऱ्या 56 लोकांचा मृत्यू झाला होता.
पाकिस्तानमध्ये अराजकता वाढत आहे
गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानमध्ये अराजकता वाढत असल्याची भीती व्यक्त होत आली आहे. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीजनं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
हे वाचा - रशिया युक्रेन युद्धामुळे अमेरिकेसह युरोपमध्ये 'या' औषधाची मागणी वाढली!
इस्लामिक स्टेट खोरासान म्हणजे काय?
ईशान्य इराण, दक्षिण तुर्कमेनिस्तान आणि उत्तर अफगाणिस्तानमध्ये येणाऱ्या प्रदेशाच्या नावावरून या संघटनेचं नाव इस्लामिक स्टेट खोरासान (ISIS-K) हे ठेवण्यात आलंय. ही संघटना 2014 मध्ये पूर्व अफगाणिस्तानात प्रथम सक्रिय झाली. निर्दयता आणि क्रूरतेनं हल्ले करणं ही या संघटनेची ओळख बनली आहे. ही संघटना मूळ इस्लामिक स्टेट (Islamic State) या दहशतवादी संघटनेशी संलग्न संघटना आहे.
हे वाचा - रशियाने मारिओपोलचे रुग्णालय घेतले ताब्यात, 400 जणांना ठेवले ओलीस
अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या मते, ISIS-K मध्ये सीरियातील काही दहशतवादी आणि इतर विदेशी अतिरेकी संघटनांचाही समावेश आहे. अमेरिकेनं अफगाणिस्तानमध्ये या गटाच्या 10 ते 15 प्रमुख दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे. ISIS-K मध्ये अफगाणींसह इतर दहशतवादी गटांमधल्या पाकिस्तानी आणि उझबेकिस्तानमधील दहशतवाद्यांचा समावेश आहे, असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, ISIS, Pakistan