नवी दिल्ली, 12 जुलै : खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवल्याच्या अनेक घटना गेल्या काही महिन्यांत उघडकीस आल्या आहेत. अशीच एक घटना थायलंडमध्ये घडली आहे. तिथे आठवडाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या कोट्यधीश व्यावसायिकाचा मृतदेह फ्रीजरमध्ये सापडला आहे. धारदार शस्त्रानं मृतदेहाचे अनेक तुकडे करून त्यानंतर ते फ्रीजरमध्ये ठेवले गेले होते. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मृताची कार सापडल्यानंतर पोलिसांना मृतदेहाचा तपास लागला. मृत व्यावसायिक हा जर्मन नागरिक आहे. डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, हॅन्स पीटर वॉल्टर मॅक (वय 62 वर्षे) असं या मृत व्यावसायिकाचं नाव आहे. जर्मन रिअल इस्टेट टायकून असलेला पीटर वॉल्टर एका आठवड्यापासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेत असलेल्या पोलिसांना पटाया शहरातील एका भाड्याच्या घरातील फ्रीजरमध्ये त्याचा मृतदेह सापडला. घटनास्थळी ऑटोमॅटिक चेनसॉ, दोरी, व्हॅक्युम सीलर, पाण्याच्या बाटल्या इत्यादी साहित्य सापडलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, मृतदेह पाहिल्यानंतर पीटर वॉल्टरची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समजतं. त्याचं डोकं, धड आणि हात-पाय वेगवेगळे केले होते. मृतदेह कापण्यासाठी ऑटोमॅटिक चेनसॉचा वापर झालेला आहे. अवयव प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवून त्यांना व्हॅक्युम सीलरनं पॅक केलेलं होतं. पीटर वॉल्टरच्या 24 वर्षांच्या थाई पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार, तो 4 जुलैपासून बेपत्ता होता. तो एका बिझनेस मीटिंगसाठी घरून निघाला होता; पण परत आला नाही. मेसेजच्या माध्यमातून त्याच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. Shocking! दोन पत्नी एक पती; मिळून त्याला संपवला; इतक्यांदा चाकू खुपसला की शरीराची केली चाळण मृतदेह कसा मिळाला? या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेले पोलीस मेजर जनरल थेराचाई चामनमोर यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, एका जोडप्यानं त्यांच्या घराशेजारी दोन परदेशी लोकांनी काळ्या पॉलिथिननं झाकलेला मोठा फ्रीझर आणल्याची माहिती दिली होती. ते घर एका जर्मन नागरिकानं भाड्यानं घेतलेलं होतं. हा सर्व प्रकार पाहून जोडप्याला संशय आला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी आल्यानंतर पार्किंगमध्ये त्यांना पीटरची मर्सिडीज बेंझ कार दिसली. घरात प्रवेश केल्यानंतर फ्रीजरमध्ये मृतदेह आढळला. सध्या पोलीस अनेक संशयितांची चौकशी करत आहेत. पोलीस लवकरच संशयितांच्या अटकेसाठी वॉरंटची मागणी करणार आहेत. खून होण्याचं कारण काय? खुनामागे खंडणीचा हेतू असावा असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणीखोर टोळीनं पीटर वॉल्टरचं अपहरण करून नंतर त्याचा खून केला असावा. कारण, खूनापूर्वी पीटरच्या बँक खात्यातून सुमारे 50 लाख रुपये काढण्यात आले होते. हे प्रकरण मालमत्तेशी संबंधित असावं, अशीही शंका एका पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केली आहे. तो म्हणाला, असं दिसतं की पीटरकडे खूप मालमत्ता असल्याची माहिती गुन्हेगाराला होती. सध्या तपास सुरू आहे. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पोलीस जनरल हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक मेडिसिन इन्स्टिट्युटमध्ये नेण्यात आला आहे. तर फ्रीझर नॉन्ग प्रू पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.