Home /News /videsh /

मेक्सिकोच्या समुद्रात भडकली आग; अचानक का पेटला लाव्हा?

मेक्सिकोच्या समुद्रात भडकली आग; अचानक का पेटला लाव्हा?

मेक्सिकोच्या (Mexico) समुद्रात आग लागल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जणू काही पाण्यात ज्वालामुखी फुटला आहे आणि लाव्हा बाहेर पडत आहे, असं हे दृश्य आहे. सोशल मीडियावर आगीच्या भडकलेल्या या ज्वालांना ‘आय ऑफ फायर’ (Eye of Fire) संबोधलं जात आहे.

पुढे वाचा ...
मेक्सिको, 4 जुलै: मेक्सिकोच्या (Mexico) समुद्रात आग लागल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जणू काही पाण्यात ज्वालामुखी फुटला आहे आणि लाव्हा बाहेर पडत आहे, असं हे दृश्य आहे. सोशल मीडियावर आगीच्या भडकलेल्या या ज्वालांना ‘आय ऑफ फायर’ (Eye of Fire) संबोधलं जात आहे. मेक्सिकोच्या पेमेक्स तेल कंपनीच्या (Pemex Oil Company) ऑइल प्लॅटफॉर्मपासून थोड्या अंतरावर आगीची ही घटना घडली असून, तब्बल पाच तास हे अग्नितांडव सुरू होतं. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाच तासापेक्षा जास्त वेळ लागल्याची माहिती रॉयटर्सनं पेमेक्सच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास वायुगळती झाल्यानं ही आग लागली. पाच तासांनी साधारण साडेदहाच्या सुमारास आग पूर्णपणे शमवण्यात यश आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. तसंच तेल उत्पादनावरही कोणताही परिणाम झाला नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. क्यू मालुब झॅप हे पेमेक्सचं सर्वांत मोठं क्रूड तेल उत्पादक केंद्र आहे. या केंद्रातून दररोज सुमारे 1.7 दशलक्ष बॅरेल तेल तयार होते. रोजच्या तेल उत्पादनांत या केंद्राचा हिस्सा 40 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. पाण्याखालून जाणाऱ्या पाईपलाईनमधून गॅस गळती झाल्यानं ही आग लागल्याचं निष्पन्न झालं असून, ही पाईपलाईन पेमेक्सच्या क्यू मालुब झॅप ऑइल डेव्हलपमेंट सेंटरला जोडते. क्यू मालुब झॅप सेंटर मेक्सिको खाडीच्या दक्षिणेकडील समुद्रात आहे. या पाइपलाइनला पडलेलं छिद्र सील करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. मुसळधार पाऊस, वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांनी क्यू मालुब झॅप केंद्राच्या टर्बोमशिनरीचं मोठं नुकसान झाल्याचा अहवाल पेमेक्सनं दिला आहे. वादळामुळे आग लागल्याची शक्यताही वर्तवण्यात आली असून, कंपनीतील कर्मचार्‍यांनी नायट्रोजनचा वापर करून ही आग रोखली, अशी माहिती पेमेक्सच्या प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे. पेमेक्ससाठी ही काही पहिली मोठी घटना नाही. औद्योगिक अपघातांबाबत पेमेक्स कंपनीचा इतिहास आहे. 2015 मध्ये कंपनीच्या अबकातून ए-परमानेंट प्लॅटफॉर्मवर झालेल्या स्फोटात चार कामगार ठार आणि 16 जण जखमी झाले होते. 300 पेक्षा जास्त लोकांची तिथून सुटका करण्यात आली होती. जानेवारी 2013 मध्ये कंपनीच्या मेक्सिको सिटी मुख्यालयात गॅसमुळे झालेल्या स्फोटात 37 लोक ठार झाले होते. तर तमाऊलिपास राज्यात सप्टेंबर 2012 मध्ये नैसर्गिक वायू प्रकल्पात झालेल्या स्फोटात 30 लोक मरण पावले होते. दरम्यान, कोरोना साथीमुळे तेलाची मागणी कमी झाल्यानं 2020 मध्ये सुमारे 23 अब्ज डॉलर्सचं नुकसान झाल्याचं या वर्षाच्या सुरूवातीलाच पेमेक्सनं जाहीर केलं होतं. अर्थात चौथ्या तिमाहीत कंपनीला 5.9 डॉलर्सचा नफाही झाला होता. या कंपनीवर 114 बिलियन डॉलर्सचं कर्ज आहे. दरम्यान, मेक्सिकोच्या तेल सुरक्षा नियामक एएसईएचे (ASEA) अध्यक्ष एंजल कॅरिजलेस यांनी मात्र वायू गळतीची घटना घडल्याचं वृत्त साफ फेटाळलं आहे. कुठलीही वायू गळती झाली नसल्याचं त्यांनी ट्विटवर म्हटलं आहे. मात्र पाण्यावर जळत होतं ते काय होतं याचं उत्तरही त्यांनी दिलेलं नाही.
First published:

Tags: Environment, Fire, Gas, International, Mexico, Pipeline, Sea

पुढील बातम्या