Home /News /videsh /

... आणि 20 वर्षांचं आयुष्य त्याच्या स्मृतीतून अचानक पुसलं गेलं! नेमकं घडलं तरी काय?

... आणि 20 वर्षांचं आयुष्य त्याच्या स्मृतीतून अचानक पुसलं गेलं! नेमकं घडलं तरी काय?

आपली पत्नी आणि मुलगी यांनाही तो ओळखत नाहीये.

    'याददाश्त खो जाना' हा प्रकार आपण सिनेमांमध्ये सर्रास पाहतो. विस्मरण हा प्रकार प्रत्यक्षात घडत नसतो असं अजिबात नाही; मात्र सिनेमात तो जितक्या सहज घडताना दिसतो, तितक्या सहज तो आपल्याला प्रत्यक्षात आजूबाजूला पाहायला मिळत नाही. अमेरिकेतल्या टेक्सासमधल्या (Texas-USA) एका 37 वर्षांच्या व्यक्तीच्या बाबतीत मात्र अक्षरशः सिनेमातच शोभेल अशी घटना प्रत्यक्षात घडलीय. डॅनियल पोर्टर (Daniel Porter) असं त्या व्यक्तीचं नाव असून, एका रात्रीत त्याच्या स्मृतिपटलावरून (Memory Loss) मागची 20 वर्षं पुसली गेली आहेत. त्यामुळे तो 17 वर्षांचा असल्याप्रमाणे वागत असून, त्यापुढे त्याच्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याही घटना त्याला आठवत नाहीयेत. आपली पत्नी आणि मुलगी यांनाही तो ओळखत नाहीये. रोजच्या जगण्यातले मनस्ताप, ताणतणाव यांना कधी तरी कंटाळलो, तर आपल्याला असं वाटतं, की बालपणच किती चांगलं होतं. शाळा-कॉलेजमध्ये असताना मित्र-मैत्रिणींबरोबर केलेली मजा पुन्हा अनुभवता आली तर बरं, असं आपल्याला कधी तरी वाटून जातं; पण डॅनियलच्या बाबतीत खरंच तसं घडलं आहे; म्हणजे तो 37 वर्षांचा असला, तरी 17व्या वर्षानंतरचं काहीही त्याला अचानक एका रात्रीत आठवेनासं झालं आहे. त्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हिअरिंग स्पेशालिस्ट (Hearing Specialist) म्हणून कार्यरत असलेला डॅनियल एके रात्री नेहमीप्रमाणे शांतपणे झोपला आणि दुसऱ्या दिवशी तो उठला तेच अनोळखीपणाची भावना घेऊन. तो आपली खोलीही ओळखू शकत नव्हता आणि आपल्या शेजारी झोपलेल्या पत्नीलाही. तो ऑफिसला जाण्याऐवजी शाळेत जायची तयारी करू लागला. कारण तो स्वतःला हायस्कूलचा विद्यार्थी समजू लागला होता. हे वाचा - VIDEO: रस्ता ओलांडणाऱ्या हत्तींना त्रास देणं आलं अंगाशी; गजराज भडकले आणि मग.. पत्नी रुथ (Ruth) हिलाही त्याने ओळखलं नाही. उलट, त्या अनोळखी महिलेने आपलं अपहरण करून आपल्याला भलत्याच ठिकाणी आणलं आहे, असं त्याला वाटू लागलं. त्याने आरशात पाहिलं, तर त्याचा स्वतःवरच विश्वास बसला नाही. 17 वर्षं वय असताना आपण एवढे वयस्कर कसे दिसू लागलो, असा प्रश्न त्याला पडत होता. पत्नी आणि 10 वर्षांच्या मुलीने त्याला सगळ्या गोष्टींची आठवण करून द्यायचा प्रयत्न केला; मात्र त्याला काहीही आठवलं नाही. शेवटी पत्नी डॅनियलला घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या घरी जाऊन पोहोचली. तिथे गेल्यावर त्याला आपलं घर आठवलं आणि खात्री पटली की आपण इथे सुरक्षित आहोत; पण तरीही तो मधल्या 20 वर्षांचं काहीही आठवू शकला नाही. हायस्कूलनंतरच्या जीवनात आपण काय शिकलो हे त्याला आठवत नाही आणि त्या 20 वर्षांत घडलेली एकही घटना त्याला स्मरत नाही. पाळीव प्राण्यांना पाहूनही तो लहान मुलांसारखा घाबरतो आहे. या सगळ्यामुळे त्याला त्याचा पेशाही सोडावा लागला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर्सनी सुरुवातीला हा शॉर्ट टर्म मेमरी लॉसचा (Short Term Memory Loss) प्रकार असल्याचं सांगितलं होतं. हे विस्मरण 24 तासांपुरतं असेल आणि त्यानंतर त्याला सगळं आठवेल, असं डॉक्टर्सनी म्हटलं होतं. प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. यामागे भावनिक ताण-तणाव (Emotional Stress) हे कारण असू शकतं, असा डॉक्टर्सचा अंदाज आहे. 2020 या वर्षात डॅनियलच्या जीवनात बरीच उलथापालथ झाली. त्याची नोकरी गेली, घर विकावं लागलं आणि स्लिप डिस्कचा त्रासही सोसावा लागला. या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत डॅनियलला ताण आला असावा आणि त्यातच त्याला विस्मरण झालं असावं, असा अंदाज आहे. विस्मरण झालं तर मागचं काहीच आठवत नाही; पण डॅनियलला वयाच्या 17व्या वर्षापर्यंतचं सगळं आठवतं आहे. केवळ 20 वर्षांच्या कालावधीतल्या आयुष्याचंच विस्मरण कसं झालं असेल, हा डॉक्टर्सनाही सतावत असलेला यक्षप्रश्न आहे.
    First published:

    Tags: America

    पुढील बातम्या