लॉस एंजलीस, 5 एप्रिल : भारतात आणि खासकरून महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूच्या ज्या डबल म्युटंट वेरिएंटचा (Corona Double Mutant Variant) संसर्ग मोठ्या प्रमाणावर आढळतो आहे, तो वेरिएंट आता अमेरिकेतही (USA) पोहोचला आहे. या वेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला आहे. एनबीसीन्यूज, तसंच इंडिया वेस्ट, दी सॅनफ्रान्सिस्को क्रॉनिकल या तिथल्या वृत्तपत्रांच्या वेबसाइट्सनी याबद्दलचं वृत्त दिलं आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या (Stanford University) हेल्थ केअर सेंटरमधल्या द क्लिनिकल व्हायरॉलॉजी लॅबने सॅन फ्रान्सिस्को बे एरियामधल्या (San Fransisco Bay Area ) एका रुग्णाला कोरोनाच्या डबल म्युटंट वेरिएंटचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेत नोंद झालेला हा पहिलाच रुग्ण असून, बे एरियामधली स्टॅनफोर्डची विविध हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्समध्ये या वेरिएंटचा संसर्ग झालेले अजून सात रुग्ण असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. स्टॅनफोर्ड हेल्थ केअरच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रवक्त्या लिसा किम यांनी सांगितलं, की या वेरिएंटचा संसर्ग झालेला हा अमेरिकेतला पहिला नोंद झालेला रुग्ण आहे. या वेरिएंटमध्ये कॅलिफोर्निया व्हॅरिएंटमधलं L452R हे म्युटेशन असतंच. शिवाय E484Q हे स्पाइक म्युटेशनही असतं. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलच्या पी वन आणि पी टू व्हॅरिएंट्समध्ये तीच स्थिती वेगळ्या अमिनो आम्लात म्युटेट झालेली असते, असंही किम यांनी ‘इंडिया-वेस्ट’ला सांगितलं.
(वाचा - देशाची चिंता वाढली; कोरोना रुग्णांनी पहिल्यांदाच 1 लाखाचा टप्पा ओलांडला )
कोरोनाच्या या नव्या डबल म्युटंट वेरिएंटची लागण महाराष्ट्रातल्या (Maharashtra) एकूण नव्या रुग्णांपैकी किमान 20 टक्के रुग्णांना झाली आहे. हा वेरिएंट भारतात गेल्या महिन्यात आढळला होता. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या नव्या बाधितांची संख्या अत्यंत वेगाने वाढत असून, गेल्या आठवड्यात रोज सुमारे 50 हजार किंवा त्याहून जास्त नव्या कोरोनाबाधितांची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या क्लिनिकल एक्सेलन्स रिसर्च सेंटरमध्ये सीनिअर स्कॉलर असलेले भारतीय वंशाचे फिजिशियन नीरव शाह यांनी, विषाणूच्या म्युटेशनमध्ये काहीही आश्चर्यकारक नसल्याचं सांगितलं. प्रत्येक विषाणू काही काळानुसार स्वतःत बदल करत असतो, त्यानुसार हे झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. डबल म्युटंट व्हायरस वेगाने पसरतो आणि वेगाने पसरणारे वेरिएंट्स अधिक प्राणघातक असतात, असं शास्त्र सांगतं, असं नीरव यांनी स्पष्ट केलं. भारतातून अमेरिकेत विमानप्रवास करून आलेल्या प्रवाशांद्वारे हा म्युटेटेड विषाणू अमेरिकेत पोहोचला असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
(वाचा - पुढच्या दोन आठवड्यात होणार कोरोनाचा महाउद्रेक! शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा )
यावरून हा वेरिएंट किती वेगाने पसरतो हे सिद्ध झालं असल्याचं स्टॅनफोर्ड हेल्थ केअरच्या क्लिनिकल व्हायरॉलॉजी लॅबचे मेडिकल डायरेक्टर बेन पिन्स्की यांनी मर्क्युरी न्यूजला सांगितलं. मर्क्युरी न्यूजने याबद्दलचं वृत्त पहिल्यांदा दिलं होतं. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या वेगाने होत असलेल्या रुग्णवाढीच्या अनुषंगाने सध्या तरी तिथे किंवा तिथून प्रवास करण्याच्या नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव नसल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार खात्याच्या प्रवक्त्याने ‘इंडिया वेस्ट’ला सांगितलं. तसंच, भारताबाहेरून भारतात येणाऱ्यांसाठी सध्या तरी पर्यटन या कारणाकरता व्हिसा दिला जात नसल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. कॅलिफोर्नियात कोविड-19 चा संसर्ग फैलावण्याचं प्रमाण सध्या कमी होत आहे. त्यामुळे लॉस एंजलीससारख्या, राज्यातल्या लोकसंख्या जास्त असलेल्या काही शहरांमध्ये निर्बंध शिथिल करून अर्थव्यवस्थेला हळूहळू चालना दिली जात आहे. अमेरिकेत सर्वांत जास्त कोरोनाबाधितांची नोंद कॅलिफोर्नियात झाली आहे. आतापर्यंत तिथल्या 35 लाख जणांना कोरोना संसर्ग झाला असून, शनिवारपर्यंत (3 एप्रिल) किमान 58 हजार जणांनी प्राण गमावले आहेत.

)







