नवी दिल्ली, 05 एप्रिल: मागील चोवीस तासांत देशात 1,03,844 नव्या रुग्णांची नोंद (Corona patients in India) करण्यात आली आहे. आतार्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात पहिल्यांदाच कोरोना रुग्णांनी एक लाखाचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे भारत आता अमेरिकेनंतर 1 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होणारा जगातील दुसरा देश ठरला आहे. दरम्यान मागील चोवीस तासांत देशातील 477 रुग्णांनी आपला जीव गमावला (Corona Death) आहे. यापूर्वी गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी एका दिवसांत सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यादिवशी कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 98,795 एवढा नोंदवला गेला होता. आता या नव्या उच्चांकी रुग्णवाढीमुळे देशाच्या चिंता वाढताना दिसत आहेत. भारतात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट 52 दिवसांपूर्वी सुरू झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना प्रादुर्भावाचा वेग 7 पट अधिक आहे, यावरून कोरोना साथीच्या धोकादायक परिस्थितीचा अंदाज घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूच्या आकडेवारीतही सुमारे 59 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात अॅक्टीव्ह कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. रविवारी अॅक्टीव्ह कोरोना रुग्णांमध्ये 50 हजाराहून अधिक नव्या रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे, जी आतापर्यंतची सर्वात मोठी नोंद आहे. गेल्या तीन दिवसांत देशातील अॅक्टीव्ह कोरोना रुग्णात 1 लाखाहून अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या आठवड्यात म्हणजेच 29 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत कोरोनाचे 5,45,325 नवीन रुग्ण आढळले आहेत. (हे वाचा- नागपूरची आरोग्य यंत्रणा कोलमडली; पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांना एकाच बेडवर उपचार ) सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संक्रमणाची स्थिती भयावह बनत चालली आहे. महाराष्ट्रात रविवारी कोविड- 19 च्या रुग्णांत 57,074 ने वाढ झाली आहे. एकाच दिवशी झालेल्या रुग्ण वाढीमध्ये ही सर्वात मोठी नोंद आहे. यामुळे राज्यात संक्रमित झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 30 लाख 10 हजार 597 वर पोहचली आहे. मागील चोवीस तासांत 222 रूग्णांच्या मृत्यूबरोबरच, राज्यात मृतांची संख्या 55 हजार 878 वर पोहचली आहे. दुसरीकडे रविवारी 27 हजार 508 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.