नवी दिल्ली 20 नोव्हेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden in Hospital) यांनी शुक्रवारी तात्पुरते अधिकार उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे हस्तांतरित केले (Kamala Harris Held US Presidency). यावेळी बायडेन यांना एक तास 25 मिनिट नियमित कोलोनोस्कोपीसाठी भूल देण्यात आली. अमेरिकेची सत्ता काही काळ उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे राहिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रात्री उशिरा दरवर्षी होणाऱ्या कोलोनोस्कोपीसाठी ऍनेस्थेसिया घेणार होते. व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन पास्की यांनी सांगितले की, बायडन यांना भूल देण्यात आलेली असताना हॅरिस यांने वेस्ट विंगमधील आपल्या कार्यालयातून काम केले.
अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपद भूषवणारे बायडेन हे सर्वात वयस्कर व्यक्ती आहेत. बायडन आज त्यांचा ७९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. CNN च्या रिपोर्टनुसार, ते त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी शुक्रवारी सकाळी वॉशिंग्टनच्या बाहेरील वॉल्टर रीड मेडिकल सेंटरमध्ये गेले होते. इथेच त्यांच्यावर दरवर्षी उपचार होतात. मात्र यावर्षी जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांची ही पहिलीच ट्रिटमेंट आहे. कोलोनोस्कोपी तपासणी दरम्यान त्यांना बेशुद्ध केलं जातं. यावेळी हॅरिस यांना अध्यक्षीय अधिकार दिले जातील.
अमेरिकेत राष्ट्रपतींना वैद्यकीय प्रक्रियेतून जावं लागलं किंवा त्यांना भूल दिली गेली तर उपराष्ट्रपतींना अध्यक्षीय अधिकार सोपवणे ही एक नियमित प्रक्रिया आहे. जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या अध्यक्षतेच्या काळात तत्कालीन उपराष्ट्रपती डिक चेनी यांना अनेक वेळा राष्ट्रपतीपद भूषवावे लागले.
अमेरिकन राज्यघटनेच्या 25 व्या दुरुस्तीच्या कलम-3 अंतर्गत अध्यक्षीय अधिकार हस्तांतरित करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. उपराष्ट्रपतींची कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर करण्यासाठी राष्ट्रपती हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि अमेरिकन संसदेच्या सिनेटच्या अध्यक्षांना पत्र लिहू शकतात.
माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलोनोस्कोपीसाठी गेल्यावर उपराष्ट्रपतींना अधिकार सोपवण्याऐवजी ते गुप्त ठेवले. या वर्षाच्या सुरुवातीला ट्रम्प यांच्या माजी प्रेस सेक्रेटरी स्टेफनी ग्रिशम यांनी याचा खुलासा केला होता. ग्रिशमने त्यांच्या 'आय विल टेक युअर क्वेश्चन्स नाऊ' या पुस्तकात सांगितले की, ट्रम्प 2019 मध्ये वॉल्टर रीड हॉस्पिटलमध्ये कोलोनोस्कोपीसाठी गेले होते, परंतु त्यांनी तत्कालीन उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्याकडे अध्यक्षीय अधिकार तर सोपवले नाहीत मात्र सोबतच या तपासणीबद्दल कोणालाही माहिती दिली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: America, Joe biden, President of america