वॉशिंग्टन, 21 जानेवारी : अमेरिकेच्या अध्यक्षपदी डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) विराजमान झाले आहेत. जो बायडन हे अमेरिकेचे 46वे अध्यक्ष आहेत. बुधवारी झालेल्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या शपथविधी सोहळ्याला जो बायडन यांच्यासोबत पत्नी जिल बायडन (Jill Biden) या देखील उपस्थित होत्या. जिल बायडन या अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' झाल्या आहेत. या शपथविधी सोहळ्यानंतर जो बायडन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला युजर्सकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.
जो बायडन यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये ते आणि त्यांची पत्नी जिल बायडन दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. या व्हिडीओत जिल बायडन जो यांचा हात पकडताना दिसत आहेत. या व्हिडीओत जो आणि जिल यांच्यामधील प्रेम दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जो बायडन यांनी कॅप्शनमध्ये 'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जिली. मी खूप खूश आहे आणि तुझे आभार मानतो की तू या प्रवासात माझ्यासोबत आहेस.', असं लिहिलं आहे.
जो बायडन यांच्या पत्नी जिल बायडन या 69 वर्षांच्या असून त्या गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या व्यवसायाने इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. आपल्या राजकीय प्रवासादरम्यान जो बायडन यांना बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागला आहे. त्यांची पहिली पत्नी आणि मुलीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर 1975 साली त्यांची भेट जिल यांच्यासोबत झाली. जो बायडन हे जिल यांच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठे आहेत. जो यांनी जिल यांना ५ वेळा प्रपोज केला त्यानंतर त्या लग्नाला तयार झाल्या. 1977 साली दोघांनी न्यूयॉर्कमध्ये लग्न केले.
I love you, Jilly, and I couldn’t be more grateful to have you with me on the journey ahead. pic.twitter.com/V4GUXAKSKg
— Joe Biden (@JoeBiden) January 20, 2021
जो बायडन यांच्याप्रमाणे जिल यांचे देखील दुसरे लग्न आहे. जो बायडन यांच्याशी लग्न करण्याआधी बिल स्टिव्हेंसन या कॉलेज फुटबॉलपटूशी त्यांचे लग्न झाले होते. जो बायडन नेहमी सांगतात की, 'दुसरी पत्नी जिलने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला नेहमी एकत्र आणले आहे. जिलने आई म्हणून माझ्या पहिल्या पत्नीच्या दोन मुलांचा देखील चांगला सांभाळ केला आहे.' 2015 मध्ये बायडन यांच्या 46 वर्षीय मुलगा ब्यूचा ब्रेन कॅन्सरमुळेमृत्यू झाला होता.
(हे वाचा - अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडेन यांना किती पगार आणि भत्ता मिळणार?)
दरम्यान, जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल क्लिंटन, जॉर्ज बुश आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यानिमित्त खास कार्यक्रमांचे आजोयन करण्यात आले होते. यामध्ये डिजिटल माध्यमातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला 'सेलिब्रेटिंग अमेरिका' असे नाव देण्यात आले होते. प्रसिद्ध गायिका लेडी गागा देखील या कार्यक्रमात सहभागी झाली होती तिने या कार्याक्रमात अमेरिकेचे राष्ट्रगीत सादर केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Joe biden, President of america, USA