वॉशिंग्टन, 21 जानेवारी : अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती (46th US President) म्हणून जो बायडेन (Joe Biden) यांनी शपथ घेतली आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीची लांबलचक प्रक्रिया, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेला निकालातील गोंधळाचा आरोप, ट्रम्प समर्थकांनी कॅपिटॉल हिलमध्ये (Capitol Hill) केलेला गोंधळ या अमेरिकेतील मागच्या काही महिन्यातील मुख्य बातम्या होत्या. या सर्व गोंधळानंतर बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष होताच ते जगातील सर्वात शक्तीशाली नेते बनले आहेत.
अमेरिकेच्या अध्यक्षांना किती पगार?
जगातील सर्वात शक्तीशाली नेते बनलेल्या जो बायडेन यांना पगार किती? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांचा पगार आणि भत्ते हे इतर सर्व राष्ट्रप्रमुखांच्या तुलनेत कितीतरी जास्त आहेत. ‘नवभारत टाईम्स’नं दिलेल्या बातमीनुसार अमेरिकेच्या अध्यक्षांना दरवर्षी 400000 डॉलर (2,94,19,440) रुपये इतका पगार मिळतो. भारतीय राष्ट्रपतींना मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत हा पाच पट जास्त आहे.
पगारासोबत मिळतात अनेक भत्ते
अमेरिकेच्या अध्यक्षांना पगाराच्या सोबतच 17 विविध प्रकारचे भत्ते दिले जातात. यामध्ये वार्षिक खर्चासाठी 50000 डॉलर (36,77,430 रुपये) प्रवासासाठी टॅक्स सोडून 10000 डॉलर (73,54,860 रुपये) आणि मनोरंजन भत्ता म्हणून 19000 डॉलर (13,97,423 रुपये) दिले जातात. त्याचबरोबर अमेरिकेच्या माजी आणि आजी अध्यक्षांना आरोग्य विमा आणि कपड्यांसाठी (Wardrobe) वेगळं बजेट असतं.
ट्रम्प यांचं होत होतं नुकसान
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती आहेत. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीमध्ये त्यांना मिळणारं वेतन हे त्यांच्या पूर्वीच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा बरंच कमी होतं.
जो बायडेन यांची पार्श्वभूमी काय?
अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष बनलेले जो बायडेन हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. त्यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1942 रोजी झाला. त्यांना तीन भाऊ आणि एक बहिण असून जो हे सर्वात मोठे आहेत. बायडेन यांच्या लहानपणी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. ते 1973 साली सर्व प्रथम अमेरिकन सिनेटवर निवडून आले. 2009 ते 2017 या काळात बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष असताना ते अमेरिकेचे उपाध्यक्ष होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Joe biden