दुबई, 19 मे : संयुक्त अरब अमिरातीत कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतातून 88 नर्स गेल्या आहेत. मंगळवारपासून त्यांनी प्रत्यक्ष सेवेला सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच नर्सचे पथक कोरोनाच्या लढ्यात युएईला मदत करण्यासाठी पोहोचलं होतं. सर्व नर्स या केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आहेत. या अॅस्टर डीएम हेल्थकेअरच्या रुग्णालयात कार्यरत होत्या.
युएईमध्ये पोहोचल्यानंतर जवळपास एक आठवडाभर त्या आयसोलेशनमध्ये राहिल्या. त्यानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच त्यांनी कामाला सुरुवात केली. अॅस्टर डीएम हेल्थकेअरचे संस्थापक अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर आझाद मूपेन यांनी सांगितलं की, पथकातील अनेक नर्सची नियुक्ती ही डीएचए अंतर्गत असलेल्या रुग्णालयात करण्यात येईल. यात काही खाजगी रुग्णालयांचाही समावेश असून गरजेनुसार नर्स सेवा देणार आहेत.
भारतातून पाठवण्यात आलेल्या नर्स त्यांच्या इच्छेने परदेशात तीन ते सहा महिन्यांसाठी गेल्या आहेत. नर्सच्या या पथकात केरळमधील 25 वर्षीय अॅश्ले जेसनचं नुकतंच लग्न झालं आहे. पतीनेच या सामाजिक कामासाठी पाठिंबा दिला असं तिने सांगितलं. केरळ सरकारच्या कोरोनाविरुद्धच्या मोहिमेत तिच्या फोटोचाही वापर केला जातो.
हे वाचा : फक्त पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक्सनी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण; प्रशासनही हैराण
बेंगळुरुतील रुग्णालयात काम केलेली स्टेफनी तीन मुलांना सोडून दुबईत गेली आहे. तिचं एक बाळ तर फक्त महिन्याभराचं आहे. तर महाराष्ट्रातील वर्षा कानिटकर यांनी त्यांच्या नऊ वर्षाच्या मुलाचा निरोपही नीट घेतला नाहीत. त्यांनी सांगितलं की, दुबईत येण्यासाठी पतीला समजावण्यात वेळ गेला. मुलाला सांभाळण्याचं आव्हान होतं. त्यातही शाळा सुरु होतील तेव्हा कठीण असेल.
हे वाचा : मुख्यमंत्र्यांचा एका कॉलनंतर उपासमारीची वेळ आलेल्या धावपटूला शिवसैनिकांची मदत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus