जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / भारतासह 20 देशांतल्या नागरिकांना सौदी अरेबियात प्रवेशबंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

भारतासह 20 देशांतल्या नागरिकांना सौदी अरेबियात प्रवेशबंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

भारतासह 20 देशांतल्या नागरिकांना सौदी अरेबियात प्रवेशबंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

सौदी अरेबियाने वीस देशांतून येणाऱ्या प्रवाशांना बुधवारपासून सौदी अरेबियात येण्यास बंदी घातली आहे. या वीस देशांत भारत आणि अमेरिकेचाही समावेश असून, ही तात्पुरती बंदी असल्याचं सौदीने स्पष्ट केलं आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

सौदी अरेबिया, 3 फेब्रुवारी : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाने (Saudi Arabia) वीस देशांतून येणाऱ्या प्रवाशांना बुधवारपासून सौदी अरेबियात येण्यास बंदी घातली आहे. या वीस देशांत भारत (India) आणि अमेरिकेचाही (USA) समावेश असून, ही तात्पुरती बंदी असल्याचं सौदीने स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेस ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. सौदी अरेबिया या मध्य पूर्वेतल्या (Middle East) देशाने भारतातून येणाऱ्या विमानांवर गेल्या सप्टेंबरपासूनच बंदी घातली आहे. आता मात्र बंदी घातलेल्या देशांची यादी सौदी अरेबियाने वाढवली आहे. 17 मेपर्यंत ही बंदी असणार असल्याची माहिती आहे. ही तात्पुरती बंदी राजनैतिक अधिकारी (Diplomats), सौदी अरेबियाचे नागरिक, वैद्यकीय अधिकारी/डॉक्टर्स आणि त्यांचे कुटुंबीय यांना लागू नसल्याचं एएफपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या सौदी अरेबियाच्या शेजारी देशांसह लेबॅनॉन, तुर्की, आयर्लंड, इटली, पोर्तुगाल, स्वीडन, स्वित्झर्लंड, भारत, अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, इंडोनेशिया, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना सौदी अरेबियात प्रवेश नाकारण्यात आला आहे.

(वाचा -  शेतकरी आंदोलनावर ट्वीटणाऱ्या सेलेब्रिटींना परराष्ट्र मंत्रालयाचं खरमरीत उत्तर )

ही बंदी लागू होण्याच्या 14 दिवस आधीपर्यंतच्या काळात कोणी वरील 20 देशांपैकी एखाद्या देशातून प्रवास केला असेल, तर अशा प्रवाशांनाही सौदी अरेबियात प्रवेश दिला जाणार नसल्याचं सौदी अरेबियाच्या गृह मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशाच प्रकारची बंदी सौदी अरेबियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही घातली होती. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची अधिक घातक स्ट्रेन सापडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 3 जानेवारी 2021 पासून आंतरराष्ट्रीय विमानं आणि बंदरं पुन्हा सुरू करण्यात आली होती.

(वाचा -  आकाशाकडे झेपावलेले रॉकेट झाले क्रॅश, भंयकर स्फोटाचा LIVE VIDEO )

कोरोना विषाणूप्रतिबंधक लशीच्या पुरवठ्याला उशीर झाल्यामुळे प्रवासबंदीचा कालावधी वाढवण्यात आला असल्याचं सौदी अरेबियाच्या आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आतापर्यंत सौदी अरेबियातल्या कोरोना रुग्णांचा आकडा 3.68 लाखांपेक्षा जास्त झाला असून, आतापर्यंत त्या देशातल्या 6383 जणांचे कोरोनामुळे बळी गेले आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाकडून ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात