नवी दिल्ली, 23 मार्च : हवामान बदलाची समस्या जगभर वाढत आहे. हवामान बदल रोखण्यासाठी जागतिक स्तरावर विविध पातळ्यांवर प्रयत्नही सुरू झाले आहेत. संस्था, संघटना, देश अनेक प्रयत्न करत आहेत. अशावेळी एक व्यक्ती म्हणून आपण काय करायचं हा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर मायक्रोसॉफ्ट (MICROSOFT) कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स (BILL GATES) यांनी दिलं आहे.
बिल गेट्स हे कायमचं हवामान बदलाचा (CLIMATE CHANGE)अभ्यास करून तो रोखण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि वेळोवेळी जाहीरपणे आपली मतंही मांडत असतात. रेडिट (Reddit) या वेबसाइटवर ASK ME ANYTHING (AMA) सेशनमध्ये बिल गेट्स यांनी अनेकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या आधी झालेल्या सेशनमध्ये आपण “How to Avoid a Climate Disaster” हे हवामान बदलांसंबंधीचं पुस्तक प्रकाशित केल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं. 'गेल्या 15 वर्षांपासून मी उर्जा आणि हवामान बदलाचा अभ्यास करत आहे. या काळात कार्बन उत्सर्जन (CARBON EMISSIONS) रोखण्यासंबंधीच्या कामात खूप प्रगती झाली आहे. आता मोठी ध्येयं गाठण्यासाठी आपण नियोजनपूर्वक छोटी-छोटी पावलं टाकायला हवीत' असंही बिल यांनी या वेबसाईटवर लिहिलंय.
कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय करायला हवं असा प्रश्न एका नेटिझनने विचारला. त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘इतर अनेक बदलांसोबतच लोकांना आहार कमी केला पाहिजे. मी आता सिंथेटिक मांस (SYNTHETIC MEAT) खायला सुरुवात केली आहे. मी ग्रीन व्हिएशन इंधन वापरतो. मी माझ्या घरी सौर उर्जा यंत्रणा बसवून घेतली आहे आणि मी आता इलेक्ट्रिक वाहनांनी (ELECTRIC VEHICLES) प्रवास करतो.’
हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात तंत्रज्ञानाचा कसा फायदा होऊ शकतो असा प्रश्न दुसऱ्या नेटिझनने केला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, ‘सिंथेटिक मांस, उर्जा साठवणूक, बांधकाम साहित्य तयार करण्याच्या नव्या पद्धती या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाची गरज भासणार आहेच. तंत्रज्ञानाची एखादी कल्पना अगदी विचित्र जरी वाटत असली तरीही त्यासंबंधी प्रयोग करून बघायला हवेत.’
एखाद्या 19 वर्षांच्या व्यक्तीला तुम्ही काय सांगाल या प्रश्नावर बिल म्हणाले, ‘तू हवामान बदलाची माहिती करून घ्यायला हवी. अगदी सगळा वेळ तेच कर असं नाही. पर्यावरण रक्षणासाठी तू करू शकशील ते काम ठरवून घेऊन ते करायला हवं आणि संपूर्ण समाजाच्या हिताचं ठरेल अशा एखाद्या पर्यावरण रक्षणाच्या कामतही योगदान द्यायला हवं.’
“How to Avoid a Climate Disaster” या पुस्तकाच्या प्रकाशनावेळीही बिल यांनी असंच मत मांडलं होतं. एमआयटी टेक्नॉलॉजी रिव्ह्यूला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, ‘श्रीमंत राष्ट्रांनी आता 100 टक्के सिंथेटिक मांसाचाच वापर सुरू करायला हवा. कदाचित तुम्हाला दोन्ही मांसाच्या चवीत फरक जाणवेल पण काही दिवसांनी या मांसाची चवही सुधारेल. या प्रक्रियेमुळे मिथेन उत्सर्जन कमी होऊन हवामान बदल रोखण्यात मदत होईल आणि हळूहळू सगळे सिंथेटिक मांसावर शिफ्ट होऊ शकतील.’
डेरेक मुलर यांच्या “Veritasium” YouTube channel ला दिलेल्या व्हिडीओ कॉल मुलाखतीत त्यांनी जगासमोरच्या अन्य दोन महासंकटांबद्दल मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘पहिलं संकट आहे हवामान बदलाचं, ज्यामुळे दरवर्षी होणाऱ्या मृत्यूचा आकडा वाढतो आहे. आता कोरोना महामारीतील जीवितहानीपेक्षाही ती संख्या अधिक आहे. दुसरं संकट म्हणजे Bio-terrorism म्हणजे जैविक दहशतवाद. यामध्ये कुणीही एखादा विषाणू तयार करू शकतो आणि तो पसरवू शकतो तसं झालं तर आता नैसर्गिदृष्ट्या कोरोनामुळे आलेल्या महामारीपेक्षा भयंकर परिस्थिती उद्भवू शकते.’ बिल गेट्स वारंवार हवामान बदलांबद्दल सांगत असतात. 2015 मध्ये त्यांनी महामारीच्या संभाव्य संकटाबद्दल जगाला इशारा दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bill gates, Climate change, Eco friendly, Electric vehicles, Reddit, Social media viral, Synthetic meat