बोगोटा, 11 जून : विमान अपघातानंतर चार मुलं तब्बल 40 दिवस बेपत्ता होती. विमान घनदाट अशा जंगलात कोसळलं होतं. मुलं जिवंत सापडण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. तरीही त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर सव्वा महिन्याच्या तपासाला यश आलं आणि चारही मुलं जिवंत आणि सुखरुप आढळली. कोलंबियात अमेझॉनच्या जंगलात 40 दिवस मुलं राहिली. या काळात त्यांनी बिया, मुळे आणि झाडांची पाने खाऊन दिवस काढले. लहानपणी त्यांना ज्या गोष्टी खाऊ शकतो हे माहिती होतं त्याच त्यांनी खाल्ल्या. कोलंबियाच्या सैनिकांना या मुलांचा शोध घेण्यासाठी स्थानिकांनीही मदत केली. चार बहीण-भाऊ 1 मे रोजी एका लहान विमानातून जात असताना ते दुर्घटनाग्रस्त झाले होते. सुदैवाने या विमान दुर्घटनेतून ते सुखरुप वाचले. यात पायलट, त्यांची आई आणि दुसऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मुलांच्या कुटुंबीयांना आशा होती की जंगलाची माहिती असणारी ही भावंडं सुखरुप परत येतील. क्रॅश झालेल्या विमानात असलेलं थोडं जेवण आणि त्यांना शोधण्यासाठी जंगलात हेलिकॉप्टर्सनी टाकलेल्या पार्सलमुळे त्यांना बरीचशी मदत झाली. यासोबतच अमेझॉनच्या जंगलात जिवंत राहण्यासाठी वेळप्रसंगी बिया, फळे, मुळे आणि झाडांची पानेही खाल्ली. VIDEO: जपानी राजदूत वडापाव खाण्याच्या स्पर्धेत पत्नीकडून हारले; मोदींनी दिली भन्नाट प्रतिक्रिया! शोध मोहिमेवेळी सैनिकांनी 20 दिवस स्थानिक ट्रेकर्ससोबत मिळून काम केलं. लष्कराच्या हेलिकॉप्टरने मुलांच्या आजीचे रेकॉर्डिंग प्रसारित केलं. यामध्ये बचाव दल जंगलात पोहोचेपर्यंत मुलांना एकाच ठिकाणी राहण्यासाठी त्यांच्या मातृभाषेत मेसेज देण्यात आला होता. मुलांच्या बचावासाठी ऑपरेशन होप राबवण्यात आलं. यात 100 सैनिक आणि 80 स्थानिक स्वयंसेवक होते. मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी बचाव दलाने चाकूने झाडांवर खूणा केल्या होत्या. तसंच स्प्रे पेंटने मार्क केलं होतं. अपघातानंतर जंगलात बेपत्ता झालेल्या चार मुलांमध्ये एकाचं वय 13 वर्षे, दुसऱ्याचं 9 वर्षे, तिसऱ्याचं 4 वर्षे इतकं आहे. तर एक लहान मुलगा फक्त 12 महिन्यांचा आहे. विमान सेसना 206 हे अमेझोनस प्रांतातील अरराकुआरा आणि ग्वावियारे प्रांताच्या दिशेने जात असताना दुर्घटना झाली होती. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हे घडल्याचं समोर आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.