नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: परदेशात शिक्षण घेण्याचं (Education in foreign Countries), नोकरी (Overseas Job Opportunity) करण्याचं तसेच पर्यटनाचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र त्यासाठी व्हिसासह (How to Apply for a visa) काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. जगातील बहुतांश देश स्टुडंट व्हिसा, टुरिस्ट व्हिसा, बिझनेस व्हिसा देतात. या प्रत्येक व्हिसासाठीचे नियम, निकष आणि प्रक्रिया वेगवेगळी आहे. परदेशात कोणत्याही कारणासाठी वास्तव्य करू इच्छिणाऱ्यांमध्ये दुबई (Dubai) हा देश आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आज अनेक भारतीय या देशात नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्तानं वास्तव्यास आहेत. परंतु, जर तुम्ही प्रथमच दुबईला काही निमित्तानं जाण्याचं नियोजन करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
यूएईत दीर्घकाळ वास्तव्य करू इच्छिणाऱ्यांना गोल्डन व्हिसा (Golden Visa) मिळू शकतो. मात्र त्यासाठी विशेष प्रक्रिया पूर्ण करावी लागते. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) 2019 मध्ये लॉंग टर्म रेसिडेन्ट व्हिसासाठी नवे नियम लागू केले आहेत.
वाचा-मोठी बातमी! Facebook वर 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त दंड, वाचा काय आहे कारण
जगातील प्रत्येक देशाचे वेगवेगळ्या स्वरूपाचे व्हिसा असतात. यात स्टुडंट व्हिसा, टुरिस्ट व्हिसा, बिझनेस व्हिसा, मेडिकल व्हिसा आदींचा समावेश असतो. यूएईचा गोल्डन व्हिसा हा त्यापैकीच एक. या व्हिसाच्या माध्यमातून कोणत्याही परदेशी नागरिकाला यूएईमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करण्याची परवानगी दिली जाते. तसेच गोल्डन व्हिसामुळे विशिष्ट श्रेणीतील लोकांना यूएईमध्ये 5 ते 10 वर्षापर्यंत वास्तव्य करता येतं.
युएईनं 21 मे 2019 मध्ये पहिल्यांदा गोल्डन व्हिसा लॉंच केला. यूएईचे उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन रशिद अल मकतूम यांनी या व्हिसाची घोषणा केली होती. गुंतवणूकदार, संशोधक, अभियंते, वैज्ञानिक आणि कलाकरांना एका जागेवर स्थिर वास्तव्य करता यावे, या उद्देशानं गोल्डन व्हिसा सुरू करण्यात आला.
तुम्हाला जर विद्यार्थी (Golden Visa for Student) म्हणून हा व्हिसा पाहिजे असेल तर त्यासाठी कोणत्याही सरकारी किंवा खासगी शाळेतून 95 टक्के गुण मिळवत माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. तसेच विद्यापीठात प्रवेशासाठी 3.75 सरासरी ग्रेड पॉईंट मिळालेले असणं गरजेचं आहे.गोल्डन व्हिसा मिळवण्यासाठीची माहिती इच्छुक व्यक्ती यूएईच्या फेडरल ऑथॉरिटी फॉर आयडेंटिटी अँड सिटीझनशीप (ICA) या वेबसाइटच्या माध्यमातून घेऊ शकतात. तसेच आयसीएच्या कार्यालयाशी 600522222 या क्रमाकांवरून थेट संपर्क साधू शकतात. तसेच यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संलग्न असलेल्या जनरल डायरेक्टर ऑफ रेसिडेन्सी अँड फॉरेनर्स अफेअर्सच्या (GDRFA) माध्यमातून देखील गोल्डन व्हिसासाठी अर्ज करू शकतात.
वाचा-बांग्लादेश मुस्लीम राष्ट्र नाही? हिंदू-मुस्लीम संघर्षावर ज्येष्ठ मंत्र्यांचं मत
गोल्डन व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही 10 वर्षापर्यंत यूएईमध्ये वास्तव्य करू शकता. 10 वर्षानंतर तुम्हाला हा व्हिसा रिन्यू करावा लागतो. युएईमध्ये गोल्डन व्हिसाधारकास साध्या व्हिसाधारकाच्या तुलनेत अधिक सुविधा मिळतात. गोल्डन व्हिसा मिळाल्यावर तुम्हाला यूएईमध्ये प्रायोजकत्वाची आवश्यकता राहत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.