वॉशिंग्टन, 23 जानेवारी: चंद्रावर माणसाला दीर्घ काळ राहता यावं, यासाठी नासा (NASA) जोरदार तयारी करत आहे. चंद्राशिवाय मंगळ ग्रह (Mars) आणि त्याच्याही पुढची मानवी अभियानं दीर्घ काळासाठी असणार आहेत. अशा प्रकारच्या दीर्घ मानवी मोहिमांमध्ये अंतराळाच्या (Space) वातावरणात जेवण हे एक मोठं आव्हान असणार आहे. आता हाच प्रश्न सोडवण्यासाठी ‘नासा’नं एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी लाखो डॉलर्सची बक्षिसं ठेवण्यात आली आहहेत. डीप स्पेस फूड चॅलेंज (Deep Space Food Challenge) अशा नावाची ही स्पर्धा आहे. अंतराळ मोहिमांमध्ये जाणाऱ्या माणसांसाठी जेवण तयार करण्यासाठीचं तंत्र विकसित करण्याची ही स्पर्धा आहे. अंतराळ मोहिमांमध्ये जाणाऱ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी हे तंत्र विकसित करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अंतराळातल्या जेवणाची समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत ‘नासा’नं इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये अनेक प्रयोग केले आहेत. अंतराळ मोहिमांबरोबरच चंद्र आणि मंगळ ग्रहावर जाणाऱ्या अंतराळवीरांना पोषक, पोटभर होणारा आहार तयार करण्यासाठी तंत्र विकसित करणं हाच या प्रयोगांमागचा उद्देश आहे. हे वाचा- Corona चा नवा व्हेरिएंट?, Omicron च्या BA.2 स्ट्रेनचा कहर आतापर्यंत ज्या अंतराळ मोहिमा झाल्या आहेत त्यामध्ये जाणाऱ्या अंतराळवीरांना पृथ्वीवरूनच जेवणखाण सोबत देण्यात येत होतं. अगदी इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये जे अंतराळवीर जास्त काळ असतात, त्यांच्यासाठीही वेळोवेळी भोजन घेऊन कार्गो यानं पाठवली जातात. आता मात्र ‘नासा’नं कॅनडा स्पेस एजन्सीसोबत ही स्पर्धा आयोजित केली आहे. या अंतर्गत नागरिकांकडून विविध प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. या स्पर्धेमध्ये नागरिकांना जास्त वेळ टिकणारा आणि पौष्टिक आहार तयार करण्यासाठी विविध कल्पना, प्रस्ताव देण्यास सांगण्यात आलं आहे. कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून त्यातून कमीत कमी अवशेष किंवा कचरा उरेल अशा प्रकारचे पदार्थ असणं अपेक्षित आहे. या स्पर्धेतल्या विजेत्यांना जवळपास 10 लाख डॉलर्सचं बक्षीस देण्यात येणार आहे. ‘अंतराळवीरांना अंतराळामध्ये असताना ठरावीक मर्यादेमध्ये जास्त काळ जेवण मिळण्यासाठी उपाययोजनाच केल्या पाहिजेत. या खाद्य तंत्रज्ञानाच्या सीमा विस्तारित केल्या तर आणि उपाय निघाला तर भविष्यकाळात अंतराळवीरांचं आरोग्यही चांगलं राहील आणि पृथ्वीवरच्या नागरिकांनाही मदत होईल’, असं ‘नासा’च्या स्पेस टेक्नॉलॉजी मिशन डायरेक्टोरेटचे असोसिएट प्रशासक जिम रायटर यांनी सांगितलं. दीर्घ काळाच्या अंतराळ मोहिमांमध्ये जेवण तयार करण्याची जास्त गरज असेल. छोट्या मोहिमा असतील तेव्हा जेवण सोबत नेलं जाऊ शकतं; पण जास्त काळ चालणाऱ्या मोहिमांसाठी पृथ्वीवरून जेवण नेलं जाऊ शकत नाही. कारण त्यामुळे अंतराळ यानामधलं अतिरिक्त वजन वाढण्याची शक्यता असते. त्याशिवाय सध्या पृथ्वीवरून जे जेवण अंतराळवीरांसोबत दिलं जातं त्यात वैविध्यही नसतं. हे वाचा- अफगाणिस्तानमध्ये वाढतंय ‘आणखी एक’ तालिबान, दोन गटांच्या लढाईत 8 जणांचा मृत्यू अंतराळात जास्त काळ राहणाऱ्यांना वैविध्यपूर्ण आणि पोषक आहाराची गरज भासते. अंतराळात जास्त दिवस राहणं हे भावनिकदृष्ट्याही मोठं आव्हान असतं. एकट्या मंगळ ग्रहाच्या मोहिमेचा विचार केला तर तिथे जायलाच कमीत कमी सातत महिने लागतात. म्हणजे ही मोहीम कित्येत वर्षं चालू शकते. अशा परिस्थितीत तिथे जेवण तयार करणं हाच उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे या आव्हानाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच संपला आहे. या वर्षी ‘नासा’ने दुसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये सहभागी टीम्सना डिझाइन्सचं प्रोटोटाईप्स बनवून त्याचं सादरीकरण करून जेवण तयार करून ते दाखवायचं आहे. यासाठी जवळपास दहा लाख डॉलरचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे. तुमच्यापैकी कोणाकडे जर अशा भन्नाट आयडिया आणि तंत्रज्ञान असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.