सिंगापूर, 2 फेब्रुवारी : प्रेमात नकार मिळणं, हा अनेकांसाठी खूप मोठा धक्का असतो. प्रेमभंग झाल्यानंतर काही जण लवकर विसरतात, तर काही जण दीर्घ काळ उदास, निराश किंवा रागावलेले असतात. सिंगापूरमध्ये प्रेमभंगाचा असाच एक प्रकार घडला आहे. पण त्यामध्ये प्रियकरानं असे काही पाऊल उचललं की ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. या प्रियकराचं नाव आहे के. काविशिगन आहे. प्रेयसी नोरा टॅन हिनं प्रेमाला नकार दिल्यानं तिच्याविरुद्ध कायदेशीर खटला दाखल केला आहे.
के. काविशिगन आणि नोरा टॅन हे दोघेही 2016मध्ये पहिल्यांदा भेटले आणि या दोघांमध्ये मैत्री झाली. काविशिगन नोराच्या प्रेमात पडला. मात्र, नोरानं नेहमीच या नात्याला चांगल्या मैत्रीचं नातं म्हणून पाहिलं. 2020 पर्यंत या दोघांमध्ये सर्वकाही ठिक होतं. काविशिगनने अखेर त्याच्या मनातल्या प्रेमाच्या भावना बोलावून दाखवल्या. पण नोराने त्याला आपल्यामध्ये मैत्रीच नातं आहे, असं सांगितलं. कारण नोराच्या मनात त्याच्याबद्दल कोणतीही प्रेमाची भावना नव्हती. तिची मनापासून इच्छा होती की, त्याने मैत्रीबद्दल खोलवर विचार करावा आणि एकमेकांसोबत कमी वेळ घालवावा.
दोघांनी एकमेकांपासून दूर राहावं, जेणेकरून चांगली व निरोगी मैत्री राहील, असं नोराचं मत होतं; पण काविशिगनला हे मान्य नव्हतं. शेवटी, त्यानं नोराला कायदेशीर कारवाईची धमकी देणारी नोटीस पाठवली. त्यामध्ये नोरा ही भावनिक त्रास आणि संभाव्य मानहानीच्या निष्काळजी कृत्यामुळे उद्भवलेल्या आर्थिक नुकसानासाठी जबाबदार आहे, असे नमूद करण्यात आलं होतं. द स्ट्रेट टाइम्समधील एका वृत्तानुसार, नोराला एकतर नातेसंबंध स्वीकारण्यासाठी किंवा तिच्यामुळे झालेल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसानास सामोरे जाण्याचा अल्टिमेटम देण्यात आला होता.
हेही वाचा - प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य, अमरावती हादरलं!
'आउटलेट'नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, नोराने अखेरीस काविशिगनसोबत समुपदेशनासाठी जाण्यास सहमती दर्शविली, जेणेकरून त्यांच्यातील प्रेमाची कल्पना पुढे जाण्यास मदत होईल; पण त्याचा उपयोग फारसा झाला नाही. काविशिगनने 18 महिने प्रयत्न केले; पण तो नोराला भेटू शकला नाही. नोराने काविशिगनशी बोलणं बंद केलं. अखेर काविशिगनने कोर्टात धाव घेऊन नोरावर 24 कोटी 54 लाख रुपये नुकसानभरपाईचा खटला दाखल केलाय.
काविशिगनने हायकोर्टात दोन खटले दाखल केले असून दावा केला की, नोराने प्रेमास नकार दिल्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. आपल्याला धक्का बसून नैराश्य आलं आहे. रात्री ॲक्टिव्ह हाय कॅपिटल ट्रेडर आणि दिवसा व्यग्र सीईओ म्हणून काम करण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम झाल्याचा आरोपही त्याने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Court, Friendship, Love story