मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पाकिस्तानने त्यांच्या गुप्तचर संघटनेच्या एके काळच्या प्रमुखालाच ठरवलं भारताचा हेर

पाकिस्तानने त्यांच्या गुप्तचर संघटनेच्या एके काळच्या प्रमुखालाच ठरवलं भारताचा हेर

Asad durani

Asad durani

Pakistan: पाकिस्तानने आपली गुप्तचर संस्था ISI चे माजी प्रमुख असद दुर्रानी यांचे भारतीय गुप्तचर संस्था RAW सोबत संबंध असल्याचं सांगितले आहे. दुर्रानी यांनी रॉचे माजी प्रमुख एएस दुलत यांच्यासमवेत एकत्रित एक पुस्तक लिहिले होते.

इस्लामाबाद, 30 जानेवारी: पाकिस्तानी  गुप्तहेर संघटना इंटर-सर्व्हिस इंटेलिजेन्सचे (ISI) माजी प्रमुख लेफ्टनेंट जनरल असद दुर्रानी (Former ISI chief Asad Durrani)  हे भारतीय गुप्तचर संघटना 'रॉ' (RAW) चे गुप्तहेर असल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले आहे. दुर्रानी यांचे नाव एक्झिट कंट्रोलच्या (ECL) यादीतून वगळण्यात येऊ नये अशी मागणी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने इस्लामाबाद हायकोर्टात केली आहे. असद दुर्रानी हे भारताच्या रॉसोबत 2008 पासून संपर्कात असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याचे देखील पाकिस्तान सरकारने म्हटले आहे.

असद दुर्रानी यांनी काही वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर भारतीय गुप्तचर संस्था रॉचे माजी प्रमुख ए. एस. दुलत (A S Dulat) यांच्याबरोबर एक पुस्तक लिहिले होते. रॉ, आयएसआय अँड द इल्यूजन ऑफ पीस' नावाचे पुस्तक दोघांनी एकत्रित लिहिले होते. दुर्रानी यांचे कायमच दुलत यांच्याबरोबर नाव जोडले गेले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने दुर्रानी यांच्यावर सैन्य आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर पाकिस्तानी मिलिट्री इंटेलिजेंस (MI) ने गृहमंत्रालयाला पत्र लिहून दुर्रानी यांचे नाव ECL मध्ये ठेवण्याचा आग्रह केला होता. या कारवाईनंतर दुर्रानी यांनी 2019 मध्ये इस्लामाबाद हायकोर्टात याला आव्हान दिले होते. सरंक्षण मंत्रालयाने देखील कोर्टात आपल्या उत्तरात दुर्रानी यांनी देशविरोधी कारवाई केल्याने त्यांचे नाव नो फ्लाई लिस्ट मध्ये ठेवल्याचे सांगितले होते.

(हे वाचा -  अमेरिकन पत्रकाराच्या मारेकऱ्याला सोडा, पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश)

पुस्तकावरून मोठा वाद

हार्पर कॉलिंसने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली होती. दुर्रानी यांच्या हवाल्याने या पुस्तकातील एका भागात दहशतवादी ओसामा बिन लादेनवरील (Osama Bin Laden) कारवाईदरम्यान अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये डील झाल्याचे देखील म्हटलं गेलं आहे.

First published:

Tags: India, Pak defence minister, Pakistan