इस्लामाबाद, 28 जानेवारी : पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं (Pakistan Supreme Court) अमेरिकन पत्रकार (Dainel Pearl) यांचा मारेकरी ओमर सईद शेखची (Omar Saeed Sheikh) मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. या हत्याकांडात आपली भूमिका ‘कमी’ होती असा दावा शेखनं केला होता. 1999 मधील कंदहार विमान अपहरणानंतर (Kandahar Plane Hijack) जैश-ए-मोहम्मदचा मोहरक्या मसूद अझहरसह ज्या तीन दहशतवाद्यांना भारतानं सोडलं होतं, त्यामध्ये शेखचा समावेश होता.
काय आहे प्रकरण?
सिंध हायकोर्टानं (Sindh High Court) यापूर्वीच पर्लचे मारेकरी फहाद नसीम, शेख मोहम्मद आदिल आणि नईद सलमान साकीब यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले होते. हायकोर्टाच्या या निर्णयाला सिंध सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
ओमर शेखसह चार आरोपींनी 18 वर्षांच्या शिक्षेनंतर सिंध हायकोर्टात सुटकेसाठी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं शेख आदिल, नसीम आणि साकीब यांची निर्दोष मुक्तता केली होती. तर, ओमर शेखला सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचं सात वर्षांमध्ये रुपांतर केलं होतं.
ओमरनं एकूण 18 वर्षा शिक्षा उपभोगली आहे. या शिक्षेमध्येच त्याची ही शिक्षा धरण्यात यावी असंही कोर्टानं सांगितलं होतं. सिंध हायकोर्टाच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती. त्यानंतर अमेरिकेच्या दबावामुळे स्थानिक सरकारनं या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठानं 2-1 अशा बहुमतानं ओमर शेखच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. अमेरिकन पत्रकार डेनियल पर्ल यांचं अपहरण आणि शिरच्छेद करुन हत्या केल्याच्या प्रकरणात ओमरला अटक करण्यात आली होती. त्यांच्या हत्येचे संपूर्ण जगभर पडसाद उमटले होते. इतक्या हाय प्रोफाईल केसमधील आरोपीला पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं आता मोकळं सोडण्याचा आदेश दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan